गुजरात विधानसभा निवडणुकीचे पहिल्या टप्प्यातील मतदान शनिवारी पार पडत आहे. पहिल्या टप्प्यात सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमधील मतदारसंघांचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून याठिकाणी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. या प्रचारादरम्यान राजकीय नेत्यांची वक्तव्ये आणि काही घटना मतदारांचे लक्ष वेधून घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी कलोल येथील आपल्या प्रचारसभेत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याविषयी सांगितलेल्या अशाच एका किस्स्याची चर्चा आता रंगली आहे.

मनमोहन सिंग राजकोटमध्ये काँग्रेसचा प्रचार करत असताना हा प्रकार घडल्याचे मोदींनी सांगितले. यावेळी एक वृद्ध व्यक्ती सुरक्षारक्षकांचे कडे भेदून मनमोहन सिंग यांच्यापर्यंत पोहोचली. ही व्यक्ती बराच वेळ मनमोहन सिंग यांच्याशी बोलत उभी होती. मनमोहन सिंगही लक्षपूर्वक या व्यक्तीचे म्हणणे ऐकून घेत होते. काहीवेळाने मनमोहन सिंग यांनी त्या व्यक्तीसमोर हात जोडले. हे दृश्य पाहून सुरूवातीला अनेकांना याचा उलगडा झाला नाही. मात्र, मनमोहन सिंग तेथून निघून गेल्यानंतर प्रसारमाध्यमांनी या व्यक्तीला गाठले आणि मनमोहन सिंग यांच्या भेटीविषयी विचारणा केली. तेव्हा एक वेगळेच सत्य ऐकायला मिळाले.

भाजपने भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई केली नाही: मनमोहन सिंग

या व्यक्तीने मनमोहन सिंग यांच्यासमोर उभे राहून काँग्रेसच्या घोटाळ्यांचा पाढाच वाचला. इतकेच नव्हे तर त्यांनी घोटाळ्यांची एक यादीच मनमोहन सिंग यांच्या हातात ठेवली. त्यामुळे मनमोहन सिंग यांना शांतपणे या व्यक्तीचे म्हणणे ऐकून घेण्याशिवाय पर्याय उरला नसल्याचा उलगडा माध्यमांना झाला.

पप्पू ते प्रौढ 

माजी पंतप्रधानांच्या हातात काँग्रेसच्या घोटाळ्यांची यादी ठेवणाऱ्या या व्यक्तीचा उल्लेख मोदींनी शुक्रवारच्या सभेत केला. यावेळी त्यांनी म्हटले की, मी मनसुख काकांचे आभार मानू इच्छितो. त्यांनी प्रामाणिक सरकारची बाजू घेत सत्य परिस्थिती मनमोहन सिंग यांच्यासमोर मांडली. काँग्रेसच्या काळात अनेक घोटाळे झाले. मग मी काँग्रेसला मतदान का करावे, असा सवाल त्यांनी मनमोहन सिंग यांना विचारल्याचे मोदींनी सांगितले. मनसुख काका हे काँग्रेस पक्षाचेच कार्यकर्ते होते. मात्र, घोटाळ्यांमुळे त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याचा दावाही मोदींनी यावेळी केला.