आरक्षणाच्या मागणीसाठी राजस्थानमध्ये तिसऱ्या दिवशीही गुर्जर सामाजाचे आंदोलन सुरुच आहे. या आंदोलनाला रविवारी हिंसक वळण मिळाले, आंदोलनकर्त्यांनी पोलिसांची ३ वाहने पेटवली तर दगडफेकीमध्ये ४ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. तसेच काही आंदोलक दिल्ली-मुंबई रेल्वे मार्गावर ठाण मांडून बसले आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून पुढील तीन दिवसांसाठी अनेक रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत.


आंदोलनकर्त्यांनी धोलपूर जिल्ह्यात आग्रा-मुरैना महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांची पोलिसांशी चकमक झाली. दरम्यान, संतप्त आंदोलनकर्त्यांनी पोलिसांची तीन वाहने पेटवून दिली. ठिकठिकाणी सुरु असलेल्या आंदोलनामुळे रविवारी कोटा विभागात १८ रेल्वे गाड्या रद्द कराव्या लागल्या तर तसेच १३ रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले. सोमवारच्या १० गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर ५ गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. मंगळवारच्या १२ गाड्या तर बुधवारच्या १५ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.


राजस्थानातील गुर्जर समाजाने नोकरी आणि शिक्षण संस्थांमध्ये प्रवेशासाठी ५ टक्के आरक्षणाची मागणी केली आहे. यामध्ये गुर्जर, रायका रेबाडी, गडिया, लोहार, बंजारा आणि गडरिया या जातींचा समावेश होतो. सध्या ओबीसींच्या आरक्षणाव्यतिरिक्त ५० टक्क्यांच्या आरक्षणाच्या सीमेमध्ये अतिमागास श्रेणीतून १ टक्का आरक्षण देण्यात येत आहे. मात्र, जोपर्यंत ५ टक्के आरक्षणाची मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरुच राहणार असल्याचे गुर्जर आंदोलनाचे नेते किरोडीसिंह बैंसला यांनी म्हटले आहे.