‘जामिया’तील घटनेत विद्यार्थी जखमी; हजारोंची सात तास निदर्शने

नवी दिल्ली : जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ परिसरात तैनात असलेल्या पोलिसांसमोरच एका युवकाने सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधातील (सीएए) आंदोलकांवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी घडली. त्यात जामियाचा विद्यार्थी जखमी झाला असून, या प्रकाराचे दिल्लीसह राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटले.

हल्लेखोर गोळीबार करण्यापूर्वी आंदोलकांमध्येच उभा होता. तो अल्पवयीन (१७) असल्याचा दावा करण्यात येत असून, त्याबाबत तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याने ‘फेसबुक लाइव्ह’ सुरू केले आणि जमावातून बाहेर येत पिस्तुलातून आंदोलकांवर गोळी झाडली. ‘ये लो आझादी.. हिंदुस्तान जिंदाबाद.. दिल्ली पोलीस जिंदाबाद..’ अशा घोषणा देत या युवकाने आंदोलकांवर गोळीबार केल्याचे जामियाच्या प्रत्यक्षदर्शी विद्यार्थ्यांनी सांगितले. या गोळीबारात शाहदाब फारूख हा विद्यार्थी जखमी झाला असून, त्याला ‘एम्स’मध्ये दाखल करण्यात आले आहे.

महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त जामियाच्या विद्यार्थ्यांनी गुरुवारी राजघाटपर्यंत शांतता मोर्चा काढण्याचे ठरवले होते. सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीविरोधात जामियाच्या विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा आंदोलन सुरू केले. ते नंतर देशभर पसरले आणि जामियापासून काही अंतरावर असलेला शाहीन बाग हा परिसर आता आंदोलनाचा केंद्रबिंदू बनला आहे. जामिया येथेही आंदोलन कायम असून मोर्चा काढण्यासाठी गुरुवारी दुपारी हजारो विद्यार्थी जमले होते. त्यामुळे या परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. पोलीसच नव्हे तर शीघ्र कृती दलाचा ताफाही तैनात असताना हिंसाचाराची घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या घटनेनंतर आंदोलन आणखी तीव्र झाले. जवळपास सात तासांनंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

या प्रकारावरून विरोधकांनी भाजपला लक्ष्य केले आहे. जामियाच्या विद्यार्थ्यांवर झालेला गोळीबार हा कटकारस्थानाचा भाग असल्याचा आरोप आपचे खासदार संजय सिंह यांनी केला. सिंह यांनी थेट अमित शहा यांच्यावर शाब्दिक हल्ला केला असून ८ फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी होणारे मतदान पुढे ढकलण्याचा शहा यांचा डाव असल्याचा आरोप सिंह यांनी केला.

दिल्लीत हे काय सुरू आहे? असा सवाल करत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी संताप व्यक्त केला. दिल्लीतील बिघडलेली कायदा व सुव्यवस्था रुळावर आणण्यासाठी केंद्राने प्रयत्न करावेत, अशी मागणी केजरीवाल यांनी केली.

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी जेमतेम आठवडाभराचा कालावधी उरला असताना भाजपने नागरिकत्व दुरुस्ती विरोधातील शाहीन बागमधील आंदोलनाभोवती प्रचार केंद्रित केला आहे. या आंदोलनाविरोधात भाजपच्या नेत्यांनी प्रक्षोभक भाषणे केली आहेत. केंद्रीय राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी प्रक्षोभक विधान केल्यानंतर दोन दिवसांनी जामिया परिसरात युवकाने गोळीबार केला. त्यामुळे दिल्ली निवडणूक प्रचार अधिक गंभीर बनला आहे.

पुण्यात हिंदू राष्ट्र सेनेची निदर्शने

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात पुण्यात गुरुवारी डॉ. कुमार सप्तर्षी, ऊर्मिला मातोंडकर आदींच्या उपस्थितीत सभा झाली. या सभेच्या ठिकाणी हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.

रोखण्याची संधीच मिळाली नाही : पोलीस

गोळीबाराची घटना काही क्षणांत घडली. हल्लेखोरास रोखण्याची संधीच मिळाली नाही, असा दावा दिल्ली पोलिसांनी केला. पोलीस मूकदर्शक बनले होते, असा आरोप आम आदमी पक्षाने केल्यानंतर पोलिसांनी आपली बाजू मांडली. हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे.

‘आझादी दे रहा हू..’

जामिया नगर येथे आंदोलकांवर गोळीबार करण्यापूर्वी हल्लेखोर युवकाने फेसबुकवर ‘आझादी दे रहा हू, शाहीन बाग खेल खत्म’ असा मजकूर लिहिला होता. गोळीबाराच्या घटनेनंतर हल्लेखोराचे फेसबुक खाते हटविण्यात आले.