पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्या प्रकरणी बाबा राम रहीम दोषी ठरला आहे. बाबा राम रहीसबोत चौघांना न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. पंचकुला येथील विशेष सीबीआय न्यायालयाने बाबा राम रहीमला दोषी ठरवलं. 17 जानेवारीला न्यायालय शिक्षा सुनावणार आहे. सिरसा येथील पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्या हत्या प्रकरणात बाबा राम रहीम मुख्य आरोपी आहे. 2002 रोजी रामचंद्र छत्रपती यांची गोळी घालून हत्या करण्यात आली होती. डेऱ्यात सुरु असणारी बेकायदेशीर कृत्यं पत्रकार रामचंद्र छत्रपती यांनी उघड केली होती.

न्यायालय निर्णय सुनावणार असल्याने हाय अलर्ट जारी करण्यात आला होता. पोलिसांनी कडक सुरक्षाव्यवस्था ठेवत 144 कलम लागू केलं होतं. पत्रकार रामचंद्र छत्रपती यांनीच बाबा राम रहीमचा खरा चेहरा जगासमोर आणला होता. साध्वींसोबत झालेल्या बलात्काराची बातमी रामचंद्र छत्रपती यांनी आपलं वृत्तपत्र ‘पूरा सच’ मध्ये छापलं होतं. यानंतर वारंवार त्यांना धमक्या मिळत होत्या. यानंतरही रामचंद्र छत्रपती निर्भीडपणे बाबा राम रहीमविरोधात लिहित होते.

डेऱ्याने हा आपल्या विरोधातील उठलेला आवाज असल्याचं मानलं. यानंतर रामचंद्र छत्रपती यांना धमक्यांचं सत्र सुरु झालं. रामचंद्र छत्रपती यांनी सिरसाच्या पोलीस महासंचालकांकडे यासंबंधी तक्रारही केली. डेऱ्यातील काहीजणांनी रामचंद्र छत्रपती यांनी जातीवर टिप्पणी केल्याचा आरोप करत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. न्यायालयात ही तक्रार खोटी असल्याचं सिद्ध झालं. यानंतरही रामचंद्र छत्रपती यांना धमक्या मिळणं सुरुच होतं.

यादरम्यान डेऱ्यातील मॅनेजर रंजीत सिंह यांची हत्या होते. रंजीत सिंह यांची बहिण डेऱ्यात साध्वी होती. रामचंद्र छत्रपती यांनी वृत्तपत्रात बातमी झापल्यानंतर पंजाब-हरियाणा न्यायालयाने सीबीआय चौकशीचा आदेश दिला होता. पोलिसांनी तपासादरम्यान रामचंद्र छत्रपती यांच्यावर गोळी झाडणाऱ्या एका आरोपीला अटक केली होती. चौकशीत त्याने आपण डेऱ्यात साधू असल्याचं सांगितलं होतं.

2003 मध्ये न्यायालयाने रंजीत आणि रामचंद्र छत्रपती यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे सोपवला होता. तपासात राम रहीम दोन्ही हत्येत मुख्य आरोपी असल्याचं समोर आलं होतं.