एच-१ बी व्हिसा असलेल्या कर्मचाऱ्यांना नियमापेक्षा कमी वेतन दिल्याच्या आरोपावरून अमेरिकेतील एका माहिती तंत्रज्ञान कर्मचारी भरती कंपनीला तीन लाख डॉलर्सचा दंड करण्यात आला आहे. एच १ बी कर्मचाऱ्यांना विहित मर्यादेच्या खूपच कमी वेतन देण्यात आल्याने ही कारवाई करण्यात आली. कामगार कायद्याचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून कंपनीला आणखी ४५ हजार डॉलर्सचा दंड केला आहे. अमेरिकेच्या कामगार वेतन विभागाने रेमंड येथील कंपनीची चौकशी केली असता त्यांची बंगळुरू व हैदराबाद येथे कार्यालये असून, त्यांनी एच १ बी व्हिसा कार्यक्रमातील नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसून आले.

पाहुण्या कर्मचाऱ्यांना ठराविक वेतनापेक्षा त्यांनी खूपच कमी वेतन दिले. पीपल ग्रुप इनकॉर्पोरेशन या कंपनीला १२ कर्मचाऱ्यांना ३०९९१४ डॉलर्स देण्यास सांगण्यात आले आहे. शिवाय ४५५६४ डॉलर्सचा दंड करण्यात आला आहे. एच १ बी व्हिसा हा अस्थलांतरित व्हिसा असून, त्यातून अमेरिकी कंपन्या परदेशी कामगारांना कामावर ठेवू शकतात. यात अनुभवी व तंत्रकुशल कर्मचाऱ्यांना उच्च वेतन देणे अपेक्षित असते. दी पीपल टेक ग्रुप या कंपनीने कर्मचाऱ्यांना नियमाप्रमाणे वेतन दिले नाही. एच १ बी व्हिसा तरतुदींचा गैरवापर करून भारतीय कामगारांना कमी पैशात कामाला ठेवून अमेरिकी कामगारांवर अन्याय केला जातो. त्या प्रकरणी ट्रम्प प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. एच १ बी व्हिसा योजनेमुळे खरेतर अमेरिकेला तंत्रकुशल कामगार भारत व चीनसारख्या देशातून उपलब्ध होतात, पण त्यासाठी तसे कुशल कामगार अमेरिकेत नाहीत हे सिद्ध करावे लागते, तरच या कामगारांना ठेवता येते. २०१३ पासून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १० कंपन्यांवर कारवाई करण्यात आली आहे.