हरयाणा, उत्तर प्रदेश व कर्नाटकात अटीतटीची लढत
राज्यसभेसाठी शनिवारी होणाऱ्या मतदानात प्रामुख्याने उत्तर प्रदेश, कर्नाटक, हरयाणा व मध्य प्रदेशात चुरस आहे. त्यात प्रामुख्याने ज्येष्ठ काँग्रेस नेते कपिल सिब्बल व ज्येष्ठ वकील आर.के. आनंद यांचे भवितव्य निश्चित होईल.
कर्नाटकमध्ये जनता दल धर्मनिरपेक्ष व अपक्ष आमदारांना लाच देण्याच्या आरोपावरून वाद निवडणूक आयोगापर्यंत गेला. उत्तर प्रदेशात ११ जागांसाठी चुरस आहे. त्यात प्रामुख्याने काँग्रेसचे कपिल सिब्बल व भाजपच्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून िरगणात उतरलेल्या प्रीती महापात्रा यांच्यात चुरस आहे. बसपकडे त्यांचे दोन उमेदवार विजयी झाल्यानंतर १२ अतिरिक्त मते शिल्लक राहत आहेत. त्यावर सिब्बल यांची मदार आहे. काँग्रेसकडे २९ मते आहेत. सिब्बल यांना विजयासाठी आणखी पाच मतांची गरज आहे. मध्य प्रदेशात काँग्रेसने ज्येष्ठ वकील विवेक टंका यांना बसपाच्या पाठिंब्याने विजय मिळेल, अशी अपेक्षा आहे. काँग्रेसला एकच मत कमी पडत आहे. मात्र उत्तर प्रदेशबाबत बसपाने आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.

कर्नाटकमध्ये नाटय़मय घडामोडी
कर्नाटकमध्ये धर्मनिरपेक्ष जनता दलात बंडाळी सुरू असल्याने काँग्रेसने तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. काँग्रेसचे जयराम रमेश व ऑस्कर फर्नाडिस हे दोन उमेदवार संख्याबळाच्या जोरावर सहज निवडून येऊ शकतात. त्यांनी निवृत्त पोलीस अधिकारी के.सी.राममूर्ती यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसकडे ३३ मते अतिरिक्त आहेत. त्यांना विजयासाठी अजून १२ मतांची गरज आहे. जनता दलाचे ४० सदस्य असले तरी त्यांना बंडखोरीने ग्रासले आहे. जनता दलाने बी. एम. फारूख यांना उमेदवारी दिली आहे. भाजपचे ४४ सदस्य असून एक जागा मताची गरज आहे. अपक्षांचा पाठिंबा मिळवण्यात अडचण नाही असे भाजपने स्पष्ट केले आहे.

राज्यसभा निवडणूक
एकूण ५७ पैकी ३० जागा बिनविरोध
२७ जागांसाठी निवडणूक