क्रिकेटर मोहम्मद शमीचा अपघात झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पत्नी हसीन जहाँने काळजी व्यक्त केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हसीन जहाँला जेव्हा रविवारी मोहम्मद शमीच्या अपघाताची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी प्रतिक्रिया दिली की, ‘आपल्याला बातमी ऐकून धक्का बसला आहे. शमी सुखरुप रहावा यासाठी देवाकडे प्रार्थना करेन’. हसीन जहाँने आपल्याला शमीचं वाईट व्हावं असं अजिबात वाटत नसल्याचंही म्हटलं आहे. आपण शमीचे कट्टर शत्रू नाही आहोत. शमी लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी देवाकडे प्रार्थना करेन असं त्यांनी म्हटलं आहे.

शनिवारी रात्री मोहम्मद शमी कारने देहरादूनहून दिल्लीसाठी निघाला होता. यावेळी एका ट्रकने त्याच्या कारला धडक दिली. अपघातात शमीला जखमा झाल्या असून डोक्याला काही टाके पडले आहेत. सध्या त्याला देहरादूनमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

पत्नी हसीन जहाँने मोहम्मद शम्मीविरोधात विवाहबाह्य संबंध ठेवल्याचा, घरगुती हिंसाचार, बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी दिल्यासोबतच अनेक गंभीर आरोप केले आहेत. हसीन जहाँने शम्मी मॅच फिक्सिंगमध्येही सामील असल्याची शक्यता व्यक्त केली होती. मोहम्मद शमीने दुबईत मोहम्मद भाईच्या म्हणण्यावर पाकिस्तानी तरुणी अलिस्बाकडून पैसे घेतल्याचा आरोपही हसीन जहाँने केला होता. शमीने आपल्या भावासोबत शारिरीक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती केल्याचा तसंच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही तिने केला होता.

हसीन जहाँने कोलकाता पोलिसांकडे शमीविरोधात एफआयआर दाखल केला आहे. शमीने मात्र आपल्याविरोधात करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले आहेत.