करोनाग्रस्तांसाठी वापरले जाणारे फेविपिराविर हे औषध बनवण्यासाठी आणि त्याच्या विक्रीसाठी हेटेरो (Hetero) या औषध निर्माण कंपनीला भारतीय औषध महानियंत्रक (DCGI) कडून परवानगी मिळाली आहे. हे जेनेरिक औषध हेटेरो लॅबने फेविविर (Favivir) नावाने बाजारात आणले आहे. हे औषध गोळ्यांच्या स्वरुपात उपलब्ध असणार असून ही एक गोळी ५९ रुपयांना मेडिकलमध्ये उपलब्ध असणार आहे.

हेटेरो लॅबने कोविफोर (Covifor) अर्थात रेमडेसेविर (Remdesivir) या औषधानंतर फेविविर हे औषध बाजारात आणले आहे. करोनाग्रस्तांवरील उपचारांमध्ये या औषधांचा वापर केला जातो. फायनान्शिअल एक्प्रेसने याबाबत वृत्त दिले आहे.

तोंडावाटे घेतले जाणारे हे अँटिव्हायरल औषध असून क्लिनिकल चाचण्यांचे या औषधाचे पॉझिटिव्ह परिणाम दिसून आले आहेत. सौम्य ते मध्यम लक्षणं असलेल्या रुग्णांवर प्रामुख्याने हे औषध वापरलं जातं.

हेटेरोनं बनवलेल्या फेविविर या औषधच्या एका गोळीची किंमत ५९ रुपये असून त्याची विक्री आणि वितरण हे हेटेरो हेल्थकेअर लिमिटेडच्या माध्यमातून केले जात आहे. हे औषध २९ जुलैपासून देशभरातील सर्व प्रकारच्या रिटेल मेडिकल स्टोअर्समध्ये आणि रुग्णालयांतील मेडिकल्समध्ये उपलब्ध असणार आहे. मात्र, डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन असेल तरच हे औषध विकत घेता येणार आहे.