एमआयटीच्या संशोधनातील निष्कर्ष
वेगाने वाढणाऱ्या चीन व भारत यासारख्या आशियाई देशात कोळसा वापरातील वाढीमुळे मान्सून प्रणालीवर परिणाम होऊन पाऊसमान कमी झाले, असे मॅसॅच्युसेटस इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेने अभ्यासात म्हटले आहे.
कोळसा जाळण्याचे प्रमाण चीनमध्ये खूप जास्त आहे. डिसेंबरच्या पॅरिस हवामान परिषदेत चीनने कोळसा वापर कमी करण्याचे मान्य केले असले तरी आशियातील विजेचा मुख्य स्त्रोत हा कोळसाच आहे. चीन व भारत या दोन देशांत मानव निर्मिती सल्फर डायॉक्साईडचा मुख्य वाटा हा विभागला गेला आहे. या देशातील इंधन ज्वलनातून सल्फेटचे कण वातावरणात पसरतात. त्यांना एरोसोल असे म्हटले जाते. ते सार्वजनिक आरोग्याला धोकादायक असतात, शिवाय स्थानिक व जागतिक हवामान बदलांना कारणीभूत ठरतात. आशियाच्या ऊर्जा पर्यायांवर हवामान बदल अवलंबून आहेत, येत्या काही दशकातही हे दोन देश कुठले ऊर्जा पर्याय निवडतात हे महत्त्वाचे आहे.
चीन व भारत या देशांची आर्थिक प्रगती होत असताना ऊर्जेची गरज वाढत आहे व त्यातून कोळशाचा वापर वाढतो आहे, त्यामुळे हवामानावर विपरीत परिणाम होतो. आशियात जर कोळसा न वापरता स्वच्छ इंधनांचा वापर झाला तर या देशांबरोबरच जागतिक हवामानातही मोठा फायदा होणार आहे. नैसर्गिक वायू तसेच कमी कार्बन असलेले पवनचक्की व फोटोव्होल्टॅइक तंत्रज्ञान त्यासाठी वापरणे गरजेचे आहे. नवीन अभ्यासानुसार एरोसोलमुळे वातावरणाच्या वरच्या थरात बदल होऊन तापमान व पाऊस यात फरक पडतो. एरोसोलच्या वाढत्या प्रमाणाने उत्तर अर्धगोलार्धात शीतकरणाचा परिणाम होईल, त्यामुळे हरितगृह वायूंमुळे वाढणारे तापमान काहीसे कमी होईल; ते दक्षिण व पूर्व आशियाच जाणवेल. पण सल्फेट एरोसोल कण वाढल्याने त्याचा ढगांवर परिणाम होईल व पृष्ठीय तापमान कमी होऊ न ढगांची परावर्तन क्षमता वाढेल, असे शिएन वँग यांनी म्हटले आहे. एरोसोल हे सूर्यप्रकाश आकाशाकडे परावर्तित करतील, पण त्यामुळे तापमानवाढ काहीशी कमी झाली तरी सल्फेटच्या एरोसोलमुळे मान्सूनला आवश्यक असलेल्या अनेक पूरक घटकांना धक्का बसेल व बऱ्याच पृष्ठभागावर अवक्षेपीकरण कमी होईल. जास्त कोळसा वापराने जे घटक वातावरणात जातील त्यामुळे चीनसह पूर्व आशियात, तसेच भारतासह दक्षिण आशियात पाऊस कमी होईल व ऑस्ट्रेलियात पाऊस वाढेल. आफ्रिकेतील साहेल भागात पाऊस कमी होईल असे एमआयटीचे बेंजामीन ग्रँडी यांनी म्हटले आहे. या भागांमध्ये पाऊस वाढण्यापेक्षा कमी झालेला आहे. अनेक भागात पाण्याची साधनेच उरलेली नाहीत, असे ‘क्लायमेट’ या नियतकालिकातील संशोधनात म्हटले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 4th May 2016 रोजी प्रकाशित
कोळशाच्या वाढत्या वापराने आशियात पावसावर परिणाम
कोळसा वापरातील वाढीमुळे मान्सून प्रणालीवर परिणाम होऊन पाऊसमान कमी झाले

First published on: 04-05-2016 at 02:15 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Higher coal use in asia may lead to reduced rainfall