24 April 2019

News Flash

सिद्धूचे शीर आणणाऱ्याला एक कोटीचे इनाम, हिंदू युवा वाहिनीची घोषणा

योगी आदित्यनाथ यांचा अपमान केल्याप्रकरणी हिंदू युवा वाहिनीची घोषणा

संग्रहित छायाचित्र

योगी आदित्यनाथ यांचा अपमान करणाऱ्या नवज्योत सिंग सिद्धूचे शीर आणा आणि एक कोटी रूपये मिळवा अशी घोषणा हिंदू युवा वाहिनीने केली आहे. हिंदू युवा वाहिनी ही संस्था उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी संबंधित आहे. कारण या संस्थेची स्थापना योगी आदित्यनाथ यांनीच केली आहे. योगी आदित्यनाथ यांचा अमपान केल्याप्रकरणी हिंदू युवा वाहिनीने आता सिद्धूचे शीर आणा आणि एक कोटी मिळवा अशी घोषणा केली आहे. हिंदू युवा सेनेचे आग्रा येथील प्रमुख तरूण सिंग यांनी ही घोषणा केली. सिद्धूचे शीर धडावेगळे करा असे त्यांनी म्हटले आहे. तसेच यावेळी सिद्धूविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली.

राजस्थान येथे झालेल्या रॅलीमध्ये सिद्धूने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात वक्तव्य केले. योगी आदित्यनाथ यांचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही. त्याचमुळे आम्ही त्याचे शीर आणणाऱ्या माणसाला एक कोटीचे इनाम देऊ असेही तरुण सिंग यांनी जाहीर केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतःला देशाचे चौकीदार म्हणवून घेतात मात्र ते इमानदार नाहीत. चौकीदार चोर आहे, तर योगी आदित्यनाथ हे सर्वात मोठे भोगी आहेत अशी टीका सिद्धू यांनी केली होती. रविवारी राजस्थानमध्ये झालेल्या सभेत त्यांनी हे वक्तव्य केले होते त्याचाच समाचार हिंदू युवा वाहिनीने घेतला आहे.

नवज्योत सिंग सिद्धू आपल्या देशाबाबत, इथल्या नेत्यांबाबत चुकीची वक्तव्ये करत आहेत. हे त्यांना करणे शोभते का? हा देश आणि इथली माणसे त्यांना पटत नसतील तर त्यांनी खुशाल पाकिस्तानला जाऊन रहावे असाही इशारा हिंदू युवा वाहिनीने दिला आहे. आता यावर सिद्धू काय उत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

First Published on December 6, 2018 5:56 pm

Web Title: hindu yuva vahini offers rs 1 crore bounty on navjot singh head for insulting yogi adityanath