राम मंदिरासाठी शिवसेनेतर्फे एक कोटी

अयोध्या : भाजप म्हणजे हिंदुत्व नव्हे, हिंदुत्व वेगळे आहे. आम्हीभाजपपासून दूर झालो आहोत, हिंदुत्वापासून नाही, अशी स्पष्टोक्ती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनचे कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी अयोध्येत केली.

शिवसेनेने हिंदुत्व सोडल्याच्या भाजपच्या आरोपाला उद्धव ठाकरे यांनी उत्तर देताना भाजप आणि हिंदुत्व या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, हिंदुत्व वेगळे आहे आणि भाजप ही वेगळी संकल्पना आहे, असे स्पष्ट केले. मुख्यमंत्री ठाकरे अयोध्या दौऱ्यावर असून त्यांनी शनिवारी अयोध्येत राममंदिर उभारण्यासाठी शिवसेनेतर्फे एक कोटी रुपये देण्याची घोषणाही केली.

राममंदिर उभारण्यासाठी एक ‘ट्रस्ट’ स्थापन झाला असून बँकेत खातेही उघडण्यात आले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वेळी महाराष्ट्रातून राममंदिरासाठी शिळा पाठविण्यात आल्या होत्या. अयोध्येत येणे ही आपल्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. आपण प्रथम नोव्हेंबर २०१८ मध्ये अयोध्येला आलो होतो आणि २०१९च्या नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो. मुख्यमंत्री होईन असे स्वप्नातही वाटले नव्हते, पण ती गोष्ट घडली. त्यामुळे आपण येथे आलो आहोत, असेही ठाकरे म्हणाले.

अयोध्येत शरयू नदीची आरती करण्याची इच्छा होती, मात्र करोना विषाणूच्या फैलावामुळे ते शक्य नाही, त्यामुळे आपण पुन्हा अयोध्येत येऊ आणि तेव्हा आरतीही करू, असेही ठाकरे यांनी सांगितले.

तीन महंत नजरकैदेत : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिलेल्या तीन महंतांना ठाकरे अयोध्येत येण्यापूर्वी काही तास अयोध्या प्रशासनाने घरात नजरकैदेत ठेवल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रभू रामचंद्र हे काल्पनिक व्यक्तिमत्त्व होते, असे वक्तव्य करणाऱ्यांची मदत घेऊन उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात सरकार स्थापन केल्याची टीका करून त्यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा या महंतांनी दिला होता. हनुमानगढी मंदिराचे महंत राजू दास, तपस्वी छावणी मंदिराचे महंत परमहंस दास आणि हिंदू महासभेचे अध्यक्ष राकेश दत्त मिश्रा यांना शनिवारी सकाळी नजरकैदेत ठेवण्यात आले, असे अयोध्येतील वरिष्ठ पोलीस अधीक्षक आशीष तिवारी यांनी सांगितले.

उत्तर प्रदेशात महाराष्ट्र भवन!

उत्तर प्रदेश सरकारने अयोध्येत जमीन उपलब्ध करून द्यावी, त्या जमिनीवर महाराष्ट्रातून येणाऱ्या भक्तांसाठी आम्ही महाराष्ट्र भवन बांधू अशी विनंती आपण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

संकुल शुद्धीकरणाची मागणी : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी नियोजित मंदिर परिसराला भेट दिल्याने मंदिराचे संकुल गंगाजलाने शुद्ध करण्याची मागणी काही महंतांनी केली आहे.