आपचे नेते योगेंद्र यादव व प्रशांत भूषण यांची पक्षातील महत्त्वाच्या पदांवरून हकालपट्टी केल्यानंतर त्यांनी आता ‘स्वराज संवाद’चे आयोजन केले आहे. मात्र अशा कार्यक्रमास कार्यकर्त्यांनी हजेरी लावल्यास बेशिस्त मानली जाईल, असा इशारा पक्षाने दिला आहे.
समाजमाध्यमांद्वारे प्रशांत भूषण व योगेंद्र यादव यांनी कार्यकर्त्यांशी संपर्क सुरू केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाने आपमधील संघर्ष वाढण्याची चिन्हे आहेत. संवाद हाच आपचा आत्मा असताना आता पक्ष त्यापासून दूर जात आहे हा विरोधाभास असल्याचे मत एका नेत्याने नोंदवले. आपचे नेते अरविंद कुमार यांनी यापूर्वीच या बैठकीला उपस्थिती ही बेशिस्त मानली जाईल, असा इशारा दिला आहे. मात्र याबाबत पक्षप्रवक्ते आदर्श शास्त्री यांना विचारले असता आम्हाला कार्यक्रम कोणता आहे हेच माहीत नाही तसेच कोणालाही असा इशारा दिला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र त्या कार्यक्रमाला कोणी गेल्यास बेशिस्त मानली जाईल, असे त्यांनी सांगितले. दुसऱ्या एका प्रवक्त्यांनी मात्र पक्षाने अशी भूमिका घेतली नसल्याचे सांगितले.
केजरीवालांवर टीका
महत्त्वाच्या पदांवरून हकालपट्टी केल्यानंतर आम आदमी पक्षाचे नेते प्रशांत भूषण यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना खुले पत्र लिहिले आहे. यात त्यांनी केजरीवाल पक्षात नेतृत्वाची हुकूमशाही आणू पाहात असल्याचा आरोप केला असून, हा लाखो चाहत्यांचा अपमान असल्याचे भूषण यांनी म्हटले आहे.