दिल्लीत १६ डिसेंबर २०१२ रोजी झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी चार आरोपींना ठोठावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेप्रकरणी दोघा आरोपींच्या शिक्षेच्या स्थगितीस सर्वोच्च न्यायालयाने १४ एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
याआधी, ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय १५ मार्च रोजी देण्यात आला होता. त्यानंतर मुकेश आणि पवन गुप्ता यांच्या शिक्षेच्या अंमलबजावणीस ७ एप्रिलपर्यंत स्थगिती देण्याचा आदेश बजावण्यात आला होता. बलात्कारित तरुणीवर सिंगापूर येथील ज्या रुग्णालयात अंतिम उपचार सुरू होते, तेथील तिच्या शवविच्छेदनाचा अहवाल सादर करण्याची याचिका आरोपींच्या वतीने अ‍ॅड. एम.एल.शर्मा यांनी केल्यानंतर खंडपीठाचे न्या. बी.एस. चौहान व जे. चेल्मेश्वर यांनी सदर अंतरिम आदेश १४ एप्रिलपर्यंत लागू राहील, असे सोमवारी स्पष्ट केले.
याप्रकरणी मुख्य आरोपी रामसिंग याचे गेल्या वर्षी मार्च महिन्यात तिहार तुरुंगात निधन झाले असून दुसरा आरोपी अल्पवयीन असल्यामुळे त्याची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली. त्याला जास्तीत जास्त तीन वर्षेच तुरंगवासाची शिक्षा होईल.