एका पशुवैद्यक तरुणीच्या बलात्कार व हत्या प्रकरणातील सर्व चारही आरोपी पोलिसांशी झालेल्या कथित चकमकीत मारले गेल्यानंतर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या (एनएचआरसी) एका शोध समितीने सुरू केलेली चौकशी रविवारी, दुसऱ्या दिवशीही सुरू होती.

आरोपींच्या कुटुंबीयांना नारायणपेट जिल्ह्य़ातील त्यांच्या गावातून हैदराबादला आणण्यात आले असून, एनएचआरसीचा चमू चौकशीचा भाग म्हणून त्यांचे निवेदन नोंदवले जाण्याची शक्यता असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

पहाटेच्या वेळी झालेल्या या चकमकीनंतर पोलिसांच्या कारवाईबद्दल वाद निर्माण झाला असून, चकमकीच्या दुसऱ्या दिवशी मानवाधिकार आयोगाने ‘सत्य शोधनाच्या’ तपासाकरिता एक चमू नेमला होता. या चमूने चार आरोपींचे मृतदेह उत्तरीय तपासणीनंतर ज्या ठिकाणी ठेवण्यात आले आहेत, त्या मेहबूबनगर जिल्ह्य़ातील सरकारी रुग्णालयाच्या शवागाराला शनिवारी भेट दिली.

न्यायवैद्यकतज्ज्ञाचा समावेश असलेल्या या चमूने या मृतदेहांची तपासणी केली, तसेच येथून सुमारे ५० किलोमीटर दूर असलेल्या चट्टनपल्ली खेडय़ालाही भेट दिली. याच ठिकाणी २८ नोव्हेंबरला पीडित महिलेचा जळालेला मृतदेह सापडला होता. याशिवाय, जवळच असलेल्या चकमक स्थळालाही चमूने भेट दिली.

शुक्रवारी चारही आरोपींच्या झालेल्या ‘एन्काऊंटर’ची दखल घेऊन मानवाधिकार आयोगाने तपासाचा आदेश दिला होता.