“मी आता थकून गेलोय” असं म्हणत करोनामुळे मृत्यू झालेल्या ४०० मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या माणसाने प्रतिक्रिया दिली आहे. रामानंद सरकार असं या माणसाचं नाव आहे तो गुवाहाटीचा आहे. मागील पाच महिन्यात रामानंदने करोनामुळे मृत्यू झालेल्या ४०० मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत. गुवाहाटी हे आसाममधलं एक मोठं शहर आहे. या शहरात करोनामुळे जे मृत्यू झाले त्यापैकी ४०० मृतदेहांवर रामानंदने अंत्यसंस्कार केले आहेत. या सगळ्या कामामुळे मी आता थकून गेलो आहे अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे.

“करोनामुळे ज्या रुग्णांचा मृत्यू झाला त्यांच्या मृतदेहांवर मी एप्रिल महिन्यापासून अंत्यसंस्कार करतोय. आत्तापर्यंत ४०० मृतदेहांवर मी अंत्यसंस्कार केले आहेत. सुरुवातीच्या काळात १ किंवा २ मृतदेहांवर अंत्यसंस्कार व्हायचे मात्र गेल्या महिन्याभरापासून दररोज १० ते १२ मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत.” असं रामानंद सरकारने म्हटलं आहे. रामानंद सरकार हा गुवाहाटी येथील उलुबारी स्मशानभूमीत काम करतो.

मागील काही आठवड्यांमध्ये आसाममध्ये करोनाचे रुग्ण वाढले आहेत. इतकंच नाही तर मृत्यूंचं प्रमाणही वाढलंय.आसाममध्ये १ लाख ३० हजार ८२३ जणांना आत्तापर्यंत करोनाची लागण झाली आहे. तर गुवाहाटी येथील स्मशानभूमीत आत्तापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या सुमारे ४०० जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत अशी माहिती तेथील जिल्हा प्रशासनाने दिली आहे. उलुबारी येथील स्मशानभूमीत हे अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. हिंदुस्थान टाइम्सने या संदर्भातले वृत्त दिले आहे. दरम्यान आत्तापर्यंत सुमारे ७२ मृतदेह हे पुरण्यात आले आहेत असंही जिल्हा प्रशासनाने सांगितलं आहे.