मी कधीच जातीपातीचे राजकारण केले नाही. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे माझी पत्नी डिंपल यादव आहे, जी की दुस-या जातीची आहे. असे उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी रविवारी इंडिया टुडे ला दिलेल्या मुलाखती दरम्यान सांगितले.

अखिलेश यांनी यावेळी हे देखील सांगितले की, भारतीय जनता पार्टीला पुन्हा सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठीच त्यांनी बहुजन समाज पार्टीशी २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये युती केली आहे. आमची युती झाल्यापासून भाजप अस्वस्थ झाली आहे. त्यामुळेच आता त्यांच्याकडून जातपात आणि धर्माचा मुद्दा काढला जात आहे. मात्र, जनता हुशार आहे, त्यांची योजना यावेळी काम करणार नाही. भाजपला उत्तर प्रदेशात यश मिळू नये म्हणूच आमची युती झाली आहे असेही त्यांनी सांगितले. तर, जातीपातीच्या राजकारणावर भाष्य करताना ते म्हणाले की, माझा जातपात आणि धर्माच्या राजकारणावर विश्वास नाही आणि कधीही नव्हता. याचे सर्वांत मोठे उदाहरण म्हणजे माझे लग्न आहे. कारण, माझी पत्नी डिंपल व मी दोघेही भिन्न जातींचे आहोत. मी जातीयवादी नाही, आम्ही दोघांनी जातीपातीच्या भिंती पाडूनच विवाह केला आहे.

जेव्ह अखिलेश यादव यांना विचारण्या आले की, जर तुमचा जातीपातीच्या राजकारणावर विश्वास नाही तर, तुम्ही यादव रेजीमेंट का निर्माण केली. यावर ते म्हणाले की, मी एकदा गुजरातला भेट दिला होती त्यावेळी मी अहिर समाजाच्या काही लोकांना भेटलो जे अहिर रेजीमेंटची मागणी करत होते. तसेच, आपली गुजरात रेजीमेंट निर्माण करण्याची इच्छा असल्याचेही त्यांनी सांगितले.

तर जातीपातीच्या राजकारणावरील प्रश्नाला उत्तर देताना, डिंपल यादव यांनी म्हटले की यादव रेजीमेंट का असू नये? मी गढवालची आहे आणि लोकांना गढवाल रेजीमेंट चांगल्याप्रकारे माहिती आहे.अशाच प्रकारे जर यादव रेजीमेंट असेल, तर काही अडचण नसावी. यात मला तरी कुठल्या जातीचा संबंध दिसत नाही.