कर्नाटक विधानसभा अध्यक्ष केआर रमेश कुमार सध्या आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. गुरुवारी ज्येष्ठ काँग्रेस नेते के एच मुनियप्पा यांच्याशी संबंध असल्यासंबंधी विचारलं असता रमेश कुमार यांनी मी पुरुषांसोबत झोपत नाही असं उत्तर दिलं. 15 फेब्रुवारी रोजी मुनियप्पा यांनी ‘रमेश कुमार आणि आपण पती, पत्नीप्रमाणे आहोत. आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद नाही’, असं म्हटलं होतं. दरम्यान रमेश कुमार यांच्या वक्तव्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला असून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

जवळपास एक महिन्याभरापुर्वीच्या वक्तव्यावर प्रतीक्रिया देताना रमेश कुमार यांनी म्हटलं की, ‘मी पुरुषांसोबत झोपत नाही. मी कोणासोबतही झोपत नाही. माझी एक पत्नी असून गेल्या दहा वर्षांपासून मी विवाहित आहे. मुनियप्पा यांना माझ्यासोबत झोपण्यात रस असू शकतो, पण माझी तशी कोणतीही इच्छा नाही. माझे कोणाशीही कोणतेच संबंध नाहीत’.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुनियप्पा यांना लोकसभा निवडणुकीचं तिकीट मिळू नये यासाठी रमेश कुमार यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यांनी अनेकदा मुनियप्पा यांच्यावर उघड टीकाही केली आहे. दरम्यान मुनियप्पा लोकसभा तिकीट मिळावी यासाठी पुरेपूर प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे कोलार लोकसभा मतदारसंघतील पाचही आमदार मुनियप्पा यांना तिकीट मिळू नये यासाठी पक्षावर दबाव आणत असल्याची माहिती आहे.