करोना प्रतिबंधक लसीमध्ये गायीची किंवा डुक्कराचीही चरबी नाही. हा हिंदू किंवा मुसलमानांचा विषय नाही. हा शुद्ध स्वरुपात वैज्ञानिक संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे याला कोणत्याही धर्माशी जोडता कामा नये. मी लस घेणार नाही, मला त्याची गरज नाही, असं योगगुरु बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे. न्यूज १८ ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

रामदेव म्हणाले, “मी वृत्तवाहिनीवर खुलेआम जाहीर करतो की, मी लसीचा वापर करणार नाही कारण मला याची गरज नाही. मला करोना देखील होणार नाही. मी अनेक लोकांना भेटतो आणि काही प्रमाणात खबरदारीही घेतो. करोनाचे किती अवतार येऊ देत मला काही होणार नाही. कारण आमचा योगावतार जिंदाबाद आहे.”

करोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत असल्याबद्दल रामदेव यांना विचारल्यानंतर ते म्हणाले, “२०२१ मध्ये सर्वसामान्य लोकांना लस मिळणे अशक्य आहे. ही लस औषध नसून प्रतिबंधक लस आहे. मी लसीचा विरोध करत नाही पण अद्याप हे समोर आलेलं नाही की लस सहा महिन्यानंतर किती प्रतिकारशक्ती राखून ठेवते. मात्र, योगासनं केल्यास प्रतिकारशक्ती कायमच राखली जाईल.”

करोनाशी घाबरुन राहण्याची गरज नाही. ज्यांना अनेक प्रकारचे आजार आहेत आणि ते योगही करतात. याशिवाय ज्यांना गरज आहे त्यांनी लस जरुर घ्यावी. मी याच्या बाजूनेही नाही आणि विरोधातही नाही. ज्यांना गरज आहे त्यांनी लस जरुर घ्यावी. बाकी जे सरकार आणि औषध कंपन्या करतील त्याचे परिणाम लवकरच समोर येतील आणि सर्वकाही चांगलं व्हावं, अशी माझी इच्छा आहे, असंही बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, भारतात करोना प्रतिबंधक दोन लसींना (कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सीन) आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचं आणि वैज्ञानिकांचं यासाठी अभिनंदन केलं आहे. या लसींना पंतप्रधानांनी करोनाविरोधातील भारताच्या लढाईचा निर्णायक क्षण आहे. यामुळे कोविडमुक्त भारताच्या मोहिमेला बळ मिळेल असेही पंतप्रधान रविवारी म्हणाले.