पश्चिम बंगालमध्ये सध्या निवडणुकीचे वारे वाहत असून राजकीय नेत्यांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळी विधानं केली जात आहेत. यावेळी नेत्यांकडून होणाऱ्या काही वक्तव्यांमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. वादग्रस्त वक्तव्यांच्या यादीत तृणमूल काँग्रेसचे नेते शेख आलम यांचंही नाव जोडलं गेलं आहे. शेख आलम यांनी आपल्या वक्तव्यात भारताचं विभाजन करण्याची भाषा केली आहे.

टीएमसी समर्थकांना संबोधित करताना शेख आलम यांनी भारतातील ३० टक्के मुस्लीम लोकसंख्या एकत्र आली तर चार पाकिस्तान तयार होतील असं म्हटलं आहे. बिरभूम येथे ते बोलत होते.

“ते म्हणतात आपण फक्त लोकसंख्येच्या ३० टक्के आहोत आणि ते ७० टक्के आहेत. ७० टक्के समर्थनासह ते सत्तेत येतील, त्यांना लाज वाटली पाहिजे. जर आपली मुस्लीम लोकसंख्या एका बाजूला गेली तर आपण चार नवे पाकिस्तान तयार करु शकतो. त्यानंतर ७० टक्के लोकसंख्या कुठे जाईल?,” असं शेख आलम म्हणाले आहेत. शेख आलम टीएमसी उमेदवाराच्या प्रचार रॅलासाठी उपस्थित होते. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं.

भाजपाने शेख आलम यांच्या वक्तव्याच्या निषेध केला आहे. भाजपा नेते अमित मालविया यांनी ममता बॅनर्जी राज्यातील बहुसंख्याक समुदायाला दुय्यम दर्जाचे नागरिक ठरवत असल्याचा आरोप केला आहे. ममता बॅनर्जी यांच्या गेल्या १० वर्षातील राजकारणामुळेच शेख आलम चार पाकिस्तान तयार करण्याचं स्वप्न पाहू शकततात अशी टीका त्यांनी केली आहे.

याशिवाय भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी नुकतंच एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. ममता बॅनर्जी यांनी बरमुडा घातला पाहिजे जेणेकरुन त्यांच्या पायाचं प्लास्टर दिसेल असं ते म्हणाले होते. १० मार्चला पाय जखमी झाल्यापासून ममता बॅनर्जी व्हिलचेअरवरुनच विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार करत आहेत.