अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि माध्यमांमधील एका गटातील वाद चिघळत असल्याचे दिसत आहे. याची सुरुवात काही दिवसांपूर्वी एका पत्रकार परिषदेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि सीएनएनचे पत्रकार जिम अकोस्टा यांच्यात झालेल्या शाब्दिक खडाजंगीने झाली होती. पत्रकार परिषदेत ट्रम्प यांच्याबरोबर झालेल्या वादानंतर व्हाइट हाऊसने अकोस्टा यांचा प्रेस पास निलंबित केला होता आणि त्यांना इतर बैठकांमध्ये भाग घेण्यास बंदी घालण्यात आली होती. परंतु, हा वाद शमण्याचे नाव घेताना दिसत नाही. एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. अकोस्टा यांनी पुन्हा एकदा जर अभद्र वर्तन केले तर त्यांना पत्रकार परिषदेतून बाहेर फेकण्यात येईल असा दमच दिला आहे.

ट्रम्प यांच्या वक्तव्यामुळे आता नवा वाद सुरु होण्याची शक्यता आहे. अकोस्टा यांचा प्रेस पास निलंबित केल्यानंतर सीएनएनने मंगळवारी न्यायालयात धाव घेतली होती. अकोस्टा यांचा पास निलंबित करणे म्हणजे सरकारी निर्णयांवरुन स्वतंत्र वार्तांकनाच्या अधिकाराचे हे उल्लंघन असल्याचे सीएनएनने न्यायालयात म्हटले होते. सीएनएनच्या अपिलानंतर अमेरिकेतील फेडरल न्यायाधीशांनी शुक्रवारी व्हाइट हाऊसला अकोस्टा यांना प्रेस संबंधीचे दस्तऐवज पुन्हा एकदा बहाल करण्याचे आदेश दिले होते. मात्र, न्यायालयाच्या आदेशानंतरही हे प्रकरण संपुष्टात आले नाही.

ट्रम्प यांनी ‘फॉक्स न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत वादग्रस्त वक्तव्य केले. जिम अकोस्टा यांना प्रेस पास पुन्हा देणे ही मोठी बाब नाही. पण जर त्यांनी पुन्हा अभ्रद व्यवहार केला तर त्यांना पत्रकार परिषदेतून बाहेर फेकले जाईल, असे त्यांनी म्हटले.

उल्लेखनीय म्हणजे, याच महिन्याच्या सुरुवातीला पत्रकार परिषदेदरम्यान ट्रम्प आणि अकोस्टा यांच्यात मध्य अमेरिकन प्रवाशांशी संबंधित एका प्रश्नावरुन वाद झाला होता. व्हाइट हाऊसने अकोस्टा यांची वर्तणूक अभ्रद आणि अपमानजनक असल्याचे म्हटले होते.

पत्रकार परिषदेदरम्यान अकोस्टा यांनी अमेरिकेच्या सीमेकडे येत असलेल्या मध्य अमेरिकेतील प्रवाशांच्या ताफ्यावरुन प्रश्न विचारला होता. या प्रश्नाचे उत्तर देण्यास ट्रम्प टाळाटाळ करताना दिसले. त्यांनी अनेकवेळा अकोस्टा यांना बसण्याची सूचना केली. पण अकोस्टा सातत्याने प्रश्न विचारत होते. नंतर तणावाची स्थिती निर्माण झाली. याचदरम्यान, ट्रम्प यांनी, आता खूप झाले.. तुम्ही सीएनएन चालवा आणि मला देश चालवू द्या, यामुळे तुमची रेटिंगही चांगली होईल, असा टोला लगावला होता.