देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असून जम्मू- काश्मीरमध्येही सध्या राजकीय वातावरण तापले आहे. नॅशनल कॉन्फरन्स या पक्षाचे नेते जावेद अहमद राणा यांनी एका सभेत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तुरुंगात टाकण्याची धमकी दिली. “मला शक्य झाले तर मी मोदींना जम्मू- काश्मीरमधील तरुणांच्या हत्येप्रकरणी मी मोदींना तुरुंगात टाकेन”, असे त्यांनी म्हटले आहे.

बुधवारी पूँछ येथे जावेद अहमद राणा यांनी स्थानिकांशी संवाद साधला. राणा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. मोदींनी हिंदू- मुस्लीम यांच्यातील संबंध बिघडवले आणि यासाठी देशातील माध्यमंही तितकीच जबाबदार आहेत, असे राणा यांनी सांगितले.  मोदी एका विशिष्ट धर्माविरोधात देशभरात द्वेष पसरवत आहेत. अल्लाहची शपथ घेऊन सांगतो की जर मला शक्य असते तर मी देशाच्या पंतप्रधानांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असता. जम्मू- काश्मीरमध्ये जितक्या हत्या झाल्या, त्या प्रकरणी आणि देशात धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी मी मोदींविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना तुरुंगात टाकेन, असेही त्यांनी सांगितले.

राणा यांच्या विधानावर भाजपाच्या वतीने प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र, मतदानाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत नेत्यांचे वादग्रस्त विधानांचे सत्र सुरू राहणार, असे दिसते. यापूर्वी समाजवादी पक्षाचे एका नेत्याने जया प्रदा यांच्या भाजपा प्रवेशावर प्रतिक्रिया देताना बेताल विधान केले होते. रामपूरमधील संध्याकाळ आता रंगीन असतील, असे विधान त्यांनी केले होते.