राफेलची कमतरता आज देशाला जाणवली. आज राफेल असते तर निकाल आणखी वेगळा लागला असता असे देश म्हणतोय. राफेलवर आधी स्वार्थ निती झाली आणि आता राफेलवरुन झालेल्या राजकारणामुळे देशाचे भरपूर नुकसान झाले आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी म्हणाले. ते इंडिया टुडे कॉनक्लेवमध्ये बोलत होते.

भारतीय हवाई दलाने पाकिस्तानातील बालकोटमधील जैश-ए-मोहम्मदच्या तळावर केलेल्या हवाई हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी हे विधान केले. मोदी विरोध जरुर करा. आमच्या योजनेत कमतरता शोधा. त्याबद्दल सरकारवर टीका करा. तुमचे स्वागत आहे पण देशाच्या सुरक्षा हितांना विरोध करु नका. मसूद अझहर, हाफिझ सईदला मदत होणार नाही याची काळजी घ्या असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

प्रत्येक जवानाचे रक्त अनमोल आहे. आजचा भारत नवीन भारत आहे. आता कोणी भारताला डोळे वटारुन दाखवण्याचे धाडस करु शकत नाही. आमचे सरकार देशहिताचे निर्णय घेण्यासाठी कटिबद्ध आहे. भारत नवीन निती, रीतीवर चालत आहे असे मोदी यांनी सांगितले. नवीन भारत निर्णायक, निडर आणि निर्भीड आहे. शत्रूच्या मनात भारताच्या पराक्रमाची भिती भरली असेल तर ते चांगले आहे. दहशतवाद्यांच्या मनात भारतीय सैनिकांची भिती असेल तर ती भिती चांगली आहे.

भ्रष्टाचाऱ्यांमध्ये कायद्याचा धाक असेल, मामाच्या बोलण्याने मोठमोठी कुटुंब गोंधळून जात असतील तर ही भिती चांगली आहे असे मोदी म्हणाले. संपूर्ण देश सैन्यासोबत उभा असताना काही लोक सैन्याबद्दलच संशय व्यक्त करतात. आज संपूर्ण विश्व दहशतवादाच्या मुद्यावर भारतासोबत असताना. काही पक्ष दहशतवादविरोधी लढाईत संशय व्यक्त करत आहेत. आज पाकिस्तान याच मुद्यांच भांडवल करत आहे. हे लोक मोदी विरोध करताना देश विरोधावर उतरले आहेत असे मोदी म्हणाले. मोदी येतील आणि जातील पण हा देश अजरामर राहणार. कृपया राजकीय फायद्यासाठी देशाच्या सुरक्षेबरोबर खेळणे बंद करा. भारताला कमकुवत करु नका असे त्यांनी विरोधकांना आवाहन केले.

काँग्रेसने आपल्या कार्यकाळात शेतकऱ्यांसाठी काही केले नाही. शेतकऱ्यांसाठी आम्ही किसान सम्मान योजना आणली. ७० वर्षानंतर १८ हजार गावांमध्ये वीज पोहोचली असे मोदी म्हणाले.