अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाचा निवडणुका आता जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत, तशा आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही वाढू लागल्या आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांनी मंगळवारी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तसंच त्यावेळी त्यांनी ट्रम्प हे वर्षद्वेषी असल्याचा आरोपही केला. तर दुसरीकडे ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये परतले असले तरी ते करोनामुक्त झाल्याचं अद्याप सांगण्यात आलेलं नाही. दरम्यान, ट्रम्प अद्याप करोनामुक्त झाले नसतील दुसरी प्रेसिडेन्शिअल डिबेट टाळली पाहिजे, असं मत जो बायडेन यांनी व्यक्त केलं.

“डोनाल्ड ट्रम्प हे अद्यापही करोनामुक्त झालेले नाहीत असं मला वाटतं. त्यामुळे दुसरी प्रेसिडेन्शिअल डिबेट टाळली पाहिजे,” असं बायडेन म्हणाले. मंगळवारी बायडेन यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. “अनेक जण करोनाबाधित होत आहेत. ही एक गंभीर समस्या आहे. मला क्लेवलँड क्लिनिकच्या डॉक्टरांकडून काही सूचना देण्यात आल्या आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रकृती आता कशी आहे याबाबत मला माहिती नाही. मी त्यांच्यासोबत डिबेटसाठी तयार आहे. परंतु अशी आशा करतो की सर्व प्रोटोकॉल्सचं पालन केलं जाईल,” असं बायडेन म्हणाले. १५ ऑक्टोबर रोजी मियामीमध्ये होणाऱ्या प्रेसिडेन्शिअल डिबेटसाठी आपण तयार असल्याचं मंगळवारी ट्रम्प यांनी ट्वीट करत सांगितलं होतं. १५ ऑक्टोबर रोजी मियामी येथे दुसरी तर २२ ऑक्टोबर रोजी टेनेसेच्या नॅशविले मध्ये तिसरी आणि अखेरची प्रेसिडेन्शिअल डिबेट होणार आहे. तर नोव्हेबर महिन्यात अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका पार पडणार आहेत.

आणखी वाचा- मिशेल ओबामांकडून ट्रम्प यांच्यावर वर्णद्वेषाचा आरोप; म्हणाल्या, “ते राष्ट्राध्यक्ष…”

ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये

काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर त्यांना अमेरिकेतील वॉल्डर रीड मेडिकल सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. परंतु चार दिवस उपचार घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प पुन्हा व्हाईट हाऊसमध्ये दाखल झाले. ट्रम्प यांनी स्वत: ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. रॉयटर्सनं दिलेल्या वृत्तानुसार डोनाल़्ड ट्रम्प अद्यापही करोनामधून पूर्णपणे बाहेर आलेले नाहीत. परंतु त्यांच्या तब्येतीत काही सुधारणा झाल्यानंतर त्यांना व्हाईट हाऊसमध्ये जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. ट्रम्प अद्यापही करोनातून पूर्णपणे बरे झाले नसल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. परंतु तब्येतीत काही सुधारणा दिसल्यानंतर त्यांना व्हाईट हाऊसमध्ये जाण्याची परवानगी देण्यात आली.