संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासाठी जिव्हाळ्याच्या असणाऱ्या अन्न सुरक्षा विधेयकाची अंमलबजावणी येत्या नोव्हेंबरपासून करण्याचा निर्णय आसाम सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी मंगळवारी ही माहिती दिली.
आसाममध्ये येत्या १९ नोव्हेंबरपासून अन्न सुरक्षा विधेयकाची अंमलबजावणी करण्यात येणार असून त्याचा ४० लाख कुटुंबांतील सुमारे सव्वा दोन कोटी आसामींना लाभ होईल, या योजनेच्या लाभार्थ्यांची नावे १ ऑगस्टला घोषित करण्यात येतील, त्यानंतर  या सूचीवर हरकती मागविल्या जातील, याबाबतची प्रक्रिया २ ऑक्टोबपर्यंत पूर्ण होईल, असे ते म्हणाले. ग्रामीण भागातील ७५, तर शहरी भागातील ५० टक्के नागरिकांना या योजनेचा लाभ होईल. या अंमलबजावणीसाठी एक मंत्रिगट नेमला आहे, असेही त्यांनी सांगितले.