तंत्रज्ञानाचे जसे फायदे असतात तसे तोटे देखील असतात. यानुसार, देशातील जहाल नक्षलवादी चळवळीने सुरक्षा रक्षकांसमोर मोठे आव्हान निर्माण केले आहे. कारण, छायाचित्रणासाठीचे अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्या ड्रोन्सचा वापर आता नक्षलवाद्यांनीही सुरु केला आहे. पहिल्यांदाच ड्रोन्सच्या माध्यमातून ते सुरक्षा रक्षकांवर लक्ष ठेवत आहेत.

छत्तीसगडमधल्या रेड कॉरिडॉरमधील किस्तराम भागातील सुरक्षा रक्षकांना आपल्या कँपच्या ठिकाणांवर कॅमेरे बसवलेले ड्रोन्स रात्रीच्या वेळी घिरट्या घालत असल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अशा प्रकारे सुरक्षा रक्षकांच्या कँपवरुन ड्रोन उडवण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. टाइम्स नाऊने याबाबत वृत्त दिले आहे.

याप्रकरणी छत्तीसगडचे पोलीस महासंचालक पी. सुंदरराज म्हणाले, छत्तीसगडच्या रेड कॉरिडॉरमधील काही ठिकाणं ही ‘नो फ्लाईंग झोन’ म्हणून घोषीत करण्यात आली आहेत. गेल्या काही महिन्यांत काही संशयास्पद ड्रोन्स सुकमा जिल्ह्यात आढळून आली होती त्यानंतर जवळच्या भागात याबाबत शोधकार्य सुरु करण्यात आले आहे.

सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, अतिरेकी डावी विचारसरणी असलेल्या भागात अशा प्रकारे संशयास्पद हालचाल आढळल्यास दिसताच क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात सुरक्षा रक्षकांना आले आहेत. स्थानिक अधिकारी आणि पीटीआयच्या वृत्तानुसार, गेल्या महिन्यांत तीन दिवसांत सुमारे चारवेळा छोटे लाल आणि पांढऱ्या रंगाचे एलईडी असलेले ड्रोन्स किस्तराम आणि पल्लोडी येथे दिसून आले होते.