अमेरिकेत फ्लोरिडा येथे बँकेच्या आतमध्ये झालेल्या गोळीबारात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. संशयित हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात आहे. झीफेन एव्हर असे संशयित हल्लेखोराचे नाव आहे. झीफेन सरळ सीब्रिंग येथील सन ट्रस्ट बँकेच्या आतमध्ये चालत गेला व त्याने अंदाधुंद गोळीबार केला.

सीब्रिंगचे पोलीस प्रमुख कार्ल होग्लंड यांनी ही माहिती दिली. झीफेनने स्वत:हूनच पोलिसांना फोन करुन बँकेच्या आतमध्ये गोळीबार केल्याची माहिती दिली. बँकेतून बाहेर निघण्यासाठी हल्लेखोराला राजी करण्याचा प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर स्वॅट टीमने इमारतीमध्ये प्रवेश केला. एकाबाजूला हल्लेखोराबरोबर बोलणे चालूच होते अखेर त्याने स्वत:हून आत्मसमर्पण केले.

गोळीबारात जखमी झालेले किंवा मरण पावलेले बँकेचे कर्मचारी होते कि, ग्राहक ते अजून स्पष्ट झालेले नाही. हल्लेखोराचा गोळीबार करण्यामागचा उद्देशही स्पष्ट झालेला नाही. हल्लेखोराने बँकेत प्रवेश केल्यानंतर दरवाजे बंद करुन घेतले व बँकेत उपस्थित असलेल्या लोकांना जमिनीवर झोपायला भाग पाडले.