देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेत संपूर्ण आरोग्य यंत्रणेवर ताण वाढला होता. रोजच्या रोज लाखोंच्या संख्येने रुग्णसंख्या वाढत होती. मात्र गेल्या काही दिवसात करोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यसाठी प्रशासन आणि आरोग्य कर्मचारी दिवसरात्र झटले. प्रशासनासह डॉक्टर, नर्स, पोलीस, आरोग्य कर्मचाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेतली. करोनाची लाट आल्यापासून आरोग्य कर्मचारी जीव धोक्यात घालून आपलं कर्तव्य बजावत आहे. करोना रुग्णांची संख्या, मृतांचा आकडा आणि एकूण परिस्थितीत नकारात्मक वातावरण तयार झालं होतं. त्यामुळे रुग्णांचं मनोबल वाढवण्यासाठी आसाममधील एका कोविड केअर सेंटरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यानी पीपीई किट घालून रुग्णांसोबत डान्स केला.

आसाममधील कोविड केअर सेंटरमध्ये पीपीई कीट घालून आरोग्य कर्मचारी करोना रुग्णांचं मनोबल वाढवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतं आहे. एएनआय वृत्तसंस्थेनं हा व्हिडिओ शेअर केला आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांनी करोना रुग्णांसोबत डान्स आणि व्यायाम केल्याचं व्हिडिओत दिसत आहे. हा व्हिडिओ आसाममधील तिनसुकिया जिल्ह्यातील डीगबोई भागात असलेल्या कोविड केअर सेंटरमधील आहे.

करोना रुग्णांवर असलेलं मानसिक दडपण दूर करण्यासाठी डॉक्टर्स आणि नर्सनी पुढाकार घेतला होता. सुरुवातीला त्यांनी डान्स केला त्यानंतर व्यायामही केला. यावेळी आरोग्य कर्मचाऱ्यांनी पीपीई कीट घातलं होतं. रुग्णसेवेसाठी डॉक्टरांनी उचलेलं पाऊल कौतुकास्पद आहे. या व्हिडिओला नेटकरी मनापासून दाद देत आहे.

West Bengal: ताडपत्री चोरल्याच्या आरोपाखाली भाजपा नेते सुवेंदू अधिकारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल

देशातील करोना रुग्ण स्थिती

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार देशात गेल्या २४ तासांत एक लाख १४ हजार ४६० नवीन करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर एक लाख ८९ हजार २३२ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. याच कालावधीत देशात दोन हजार ६७७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या १४ लाख ७७ हजार ७९९ रुग्ण उपचाराधीन असून, करोना बळींची एकूण संख्या तीन लाख ४६ हजार ७५९ वर पोहोचली आहे.