जाहीर सभांमध्ये भाषण करण्याच्या कौशल्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपाचे आदर्श नेते अटल बिहारी वाजपेयी यांच्यापेक्षा दोन पावलं पुढे आहेत असे मत जनता दल सेक्युलरचे प्रमुख एच.डी.देवेगौडा यांनी व्यक्त केले. दोनच दिवसांपूर्वी देवेगौडा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले होते. २०१४ मध्ये देवेगौडा लोकसभा सदस्यत्व सोडणार होते. त्यावेळी मोदींनी त्यांना तसे करण्यापासून रोखले होते. त्यासाठी त्यांनी मोदींचे कौतुक केले.

जाहीर सभांमध्ये भाषण करण्यात मोदी हे वाजपेयींपेक्षा दोन पावलं पुढे आहेत असे देवेगौडा म्हणाले. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले कि, १९९७ साली काँग्रेसने जेव्हा माझे सरकार पाडले तेव्हा वाजपेयींना माझ्या सरकारला पाठिंबा द्यायचा होता. पण मी नकार दिला असे देवेगौडा म्हणाले. मला सत्तेचा लोभ नसून मी एक वेगळा माणूस आहे असे देवेगौडा म्हणाले.

उत्तर प्रदेशच्या लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपाच्या पराभवाने जसे वातावरण बदलले तसेच कर्नाटकाच्या निकालाने देशातील राजकीय चित्र बदलून जाईल असा विश्वास देवेगौडा यांनी व्यक्त केला. उद्या काय होईल हे मी सांगू शकत नाही पण प्रादेशिक पक्षाला सत्ता मिळावी यासाठी मी माझ्याबाजूने पूर्ण प्रयत्न करत आहे असे ते म्हणाले. हिंदी भाषिक पट्ट्यात मागच्या दोन वर्षात काँग्रेसची अधोगती झाली आहे. त्यामुळे आता कर्नाटकावर त्यांची सर्वात जास्त मदार आहे. पण इथेही काँग्रेसची फारशी वेगळी परिस्थिती नाही असे देवेगौडा म्हणाले.