देशातील करोना रुग्णांची संख्या ५ लाख ८५ हजार ४९३ झाली असून गेल्या चोवीस तासांमध्ये १८ हजार ६५३ रुग्णांची भर पडली आहे.

गेल्या महिन्याभरात ३ लाख ८६ हजार रुग्ण वाढले. ३१ मे रोजी रुग्णसंख्या १ लाख ९८ हजार होती. गेल्या १२ दिवसांमध्ये २ लाखांपेक्षा जास्त रुग्णांची वाढ झाली.

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सुमारे ६० टक्क्यांवर (५९.४३ टक्के) पोहोचले आहे. उपचाराधीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ३० हजारांनी जास्त आहे. एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३ लाख ४७ हजार ९७८ इतकी झाली आहे. २ लाख २० हजार ११४ रुग्ण उपचाराधीन आहेत. एकूण १७ हजार ४०० मृत्यू झाले असून गेल्या चोवीस तासांमध्ये ५०७ रुग्णांचा मृत्यू झाला.

राज्यात साडेपाच हजार नवे रुग्ण

राज्यात गेल्या २४ तासांत ५५३७ नव्या रुग्णांचे निदान झाले. मुंबई, पुणे, कल्याण-डोंबिवली आणि ठाणे शहरांमध्ये जास्त रुग्ण आढळले आहेत. गेल्या दोन दिवसांत राज्यात १९८ जण मृत्युमुखी पडले. राज्यात करोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ८०५३ एवढी झाली. गेल्या २४ तासांत पुणे (७०७), कल्याण-डोंबिवली (४६७), ठाणे (४०७), नवी मुंबई (२४२), वसई-विरार (१८५), पनवेल (१६५) रुग्ण आढळले.

मुंबईतील एकूण बाधितांची संख्या ७८ हजारांवर

मुंबईत बुधवारी १,५११ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे बाधितांचा आकडा ७८ हजाराच्यापुढे गेला आहे. तर ४८ तासांत ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या दोन महिन्यात एका दिवसातील ही सर्वात कमी मृत्यूसंख्या आहे.  मात्र यापूर्वीचे ६९ मृत्यू उशीराने अहवालात समाविष्ट केल्यामुळे मृतांचा आकडा ४,६२९ वर गेला आहे. त्यामुळे मृत्यूदर ५.८ वर कायम आहे. मृत्यूदर कमी करण्यासाठी पालिका आयुक्तांनी नुकताच कृती आराखडा तयार केला असून प्रत्येक गंभीर रुग्णाची सांघिक  जबाबदारी रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, सेवा कर्मचारी यांच्यावर सोपवली आहे.