फिडे जागतिक ऑनलाइन बुद्धिबळ ऑलिंपियाड स्पर्धेत भारतानं रविवारी पहिल्यांदाच सुवर्ण पदक जिंकत इतिहास रचला. या स्पर्धेदरम्यान इंटरनेट आणि सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याने या ऑनलाइन स्पर्धेत भारत आणि रशियाला संयुक्त विजेता घोषित करण्यात आले.

सुरुवातीला रशियाला विजेता घोषित करण्यात आलं कारण फायनलमध्ये भारताचे दोन खेळाडू निहाल सरीन आणि दिव्या देशमुख यांनी सर्व्हरसोबत कनेक्शन होत नसल्याने वेळ गमावला. भारताने या वादग्रस्त निर्णयाला विरोध दर्शवला त्यानंतर याची समिक्षा करण्यात आली आणि भारत-रशिया या दोन्ही देशांना संयुक्त विजेता घोषित करण्यात आलं.

आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघानं (फिडे) पहिल्यांदाच कोविड-१९ आजारामुळं अशा प्रकारे ऑनलाइन ऑलिंपियाडचं आयोजन केलं होतं. दरम्यान, संस्थेने ट्विट करीत अंतिम निर्णय घोषित केला. फिडे अध्यक्ष अर्काडी डोवोरकोविच यांनी दोन्ही संघ भारत आणि रशियाला फिडे ऑनलाइन बुद्धिबळ ऑलिंपियाड स्पर्धेचा विजेता घोषीत करीत दोघांना सुवर्णपदक देण्याचा निर्णय घेतला. अंतिम सामन्यानंतर भारताचा दिग्गज खेळाडू विश्वनाथन आनंद यांनी ट्विट केलं, “आम्ही चॅम्पियन आहोत, रशियाचं अभिनंदन!”