मसूर अझरवरून भारताने सुनावले

जैश ए महंमदचा प्रमुख व पठाणकोट हल्ल्याचा सूत्रधार मौलाना मसूद अझर याला संयुक्त राष्ट्रांनी दहशतवादी जाहीर करून त्याच्यावर र्निबध घालण्याच्या भारताच्या प्रस्तावावर नकाराधिकार वापरल्याचा मुद्दा परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी त्यांचे समपदस्थ वँग यी यांच्याशी चर्चेत उपस्थित केला. रशिया-चीन व भारत यांच्या परराष्ट्रमंत्र्यांची त्रिपक्षीय बैठक झाली असता त्या पाश्र्वभूमीवर सुषमा स्वराज यांनी नकाराधिकाराच्या मुद्दय़ावर चिंता व्यक्त केली.

अधिकृत सूत्रांनी सांगितले की, सुषमा स्वराज या अनेक मुद्दय़ांवर चर्चा करणार आहेत. चीनने या महिन्याच्या सुरुवातीला मौलाना मसूद अझर याला दहशतवादी ठरवून र्निबध लागू करण्यासाठी आवश्यक निकषांची पूर्तता झाली नाही असे सांगून नकाराधिकार वापरला होता. चीनने नकाराधिकार वापरण्याची ही पहिलीच वेळ नसून याआधीही पाकिस्तानी दहशतवादी गट व त्यांचे म्होरके यांच्यावर भारताने र्निबधाची मागणी केली असता चीनने कोलदांडा घातला होता. संयुक्त राष्ट्रांनी २००१ मध्ये जैश ए महंमद या संघटनेवर बंदी घातली होती, पण २००८ मधील मुंबई हल्ल्यानंतर भारताने अझरवर र्निबधाची मागणी केली असता चीनने ते प्रयत्न हाणून पाडले होते. मुंबई हल्ल्याचा म्होरक्या झाकी उर रहमान याला तुरुंगातून सोडल्यानंतर त्यावरही संयुक्त राष्ट्रांकडे पाकिस्तानवर कारवाईची मागणी भारताने केली होती पण त्यातही अपयश आले होते. अझर याच्यावर र्निबध जारी करण्याच्या प्रस्तावावर चीनने नकाराधिकार वापरला होता तो प्रश्न उच्चस्तरीय पातळीवर चीनकडे उपस्थित केला जाईल असे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी सांगितले. दरम्यान छुप्या पद्धतीने नकाराधिकार वापरणे बंद करावे असे भारताने संयुक्त राष्ट्रांना सांगितले आहे.

स्मोलेन्स्क येथे वैद्यकीय अकादमीच्या परिसरातील आगीत मरण पावलेल्या  करिश्मा उदय भोसले व पूजा कल्लूर या विद्यार्थिनी तसेच कझान येथे मारले गेलेले काश्मिरी उद्योजक यासीर जावेद यांच्याबाबतचे प्रश्न परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी रशियाचे परराष्ट्र मंत्री लावारोव यांच्याशी चर्चेत उपस्थित केले. याबाबतची चौकशी प्रगतीपथावर आहे असे लावारोव यांनी सांगितले. तेवीस वर्षांच्या रशियन मुलीवर भारतात तिच्या मित्राने अ‍ॅसिड हल्ला केल्याच्या प्रकरणाबाबत स्वराज यांनी खेद व्यक्त केला त्याप्रकरणी चौकशी चालू असल्याचे सांगून त्यांनी लावारोव यांना आश्वस्त केले.