डोकलाम या ठिकाणी चीन करत असलेल्या बांधकामावर वाद निर्माण झाला. मात्र सीमा प्रश्नावर आता चीनने सावध भूमिका घेतली आहे. सीमा प्रश्न चीन आणि भारत या दोन्ही देशांनी शांततेच्या मार्गाने सोडवावा असे आवाहन चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने केले आहे. चीन आणि भारत या दोन्ही देशांनी शांततेच्या मार्गाने सीमा प्रश्नावर चर्चा करणे आवश्यक आहे. तसेच दोन्ही देशांनी एकमेकांच्या सहयोगाने एकमेकांना सीमाप्रश्नी भेडसावणाऱ्या समस्या सोडवल्या पाहिजेत. असे झाल्यास एकमेकांच्या समस्या लक्षात येतील तसेच मतभेद टाळून आपण त्यातून सुवर्णमध्य गाठू शकू असे मत चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ च्युनिंग यांनी नोंदवले आहे.

डोकलाम हा चीनचाच भाग आहे असा दावा चीनने वारंवार केला आहे. तसाच तो याही वेळी केला. काही दिवसांपूर्वीच डोकलामच भागात चीनने बांधकाम केल्याची काही सॅटेलाईट छायाचित्रे प्रसिद्ध झाली होती त्याबाबत बोलताना च्युनिंग यांनी १८९० मध्ये चीन आणि ब्रिटन मध्ये झालेल्या कराराचे उदाहरण दिले आहे. भारत आणि चीनच्या सिक्कीम भागात सीमारेषेजवळ असलेला भाग म्हणजेच डोकलाम हा चीनच्याच ताब्यात आहे असे च्युनिंग यांनी म्हटले आहे.

काही प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार चीनला या डोकलाम भागात सैन्य दलासाठी रहिवासी इमारती उभारायच्या आहेत. तसेच या कारणामुळेच डोकलाम भागात बांधकाम करण्यात चीनचा उत्साह दिसून येतो आहे. डोकलाममध्ये चीन आणि भारत या दोन्ही देशांनी सैन्य उभे केले होते. सुमारे ६५ दिवसांपेक्षा जास्त हा वाद चिघळला होता. चीनने अनेकदा या प्रश्नावरून भारताला युद्धाच्या धमक्या दिल्या. मात्र भारताने शांततेचे धोरण स्वीकारले ज्यानंतर हा वाद संपुष्टात आला आणि दोन्ही देशांनी सैन्य मागे घेतले. मात्र या घटनेला काही महिने उलटताच चीनने डोकलाममध्ये बांधकाम सुरु केले. ज्यामुळे पुन्हा एकदा वादाला तोंड फुटले आहे. अशात दोन्ही देशांनी हा प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडवावा असे आता चीनने म्हटले आहे.