भारत आणि चीन यांच्यातील सप्तसुत्री सौहार्द सिद्धांतांचा दाखला देत पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी आता दोन्ही देशांनी सीमाप्रश्न लवकर सोडवायला हवा असे म्हटले आहे. दोन्ही देशांनी एकमेकांचे हित व सार्वभौमत्व लक्षात घेऊन हे पाऊल तातडीने उचलणे गरजेचे असल्याचे सिंग त्यांच्या भाषणामध्ये म्हणाले.
चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या ‘सेंट्रल पार्टी स्कूल’मध्ये भविष्यातील चिनी नेत्यांसमोर डॉ. मनमोहन सिंग यांनी गुरूवारी भाषण केले. आघाड्यांचे आणि नियंत्रणाचे जुने सिद्धांत आज घडीला कुचकामी असल्याचे मनमोहन सिंग यांनी उपस्थितांना सांगितले.
भारत आणि चीन यांना आता कोणी थोपवू शकत नसून, गतकाळातील इतिहास त्याचे चांगले उदाहरण असल्याचे ते म्हणाले. दोन्ही देशांनी इतरांना देखील थांबवण्याचा प्रयत्न करू नये, असा देखील सल्ला सिंग यांनी त्यांच्या भाषणामधून दिला.
“दोन्ही देशांनी ‘पंचशील’ तत्वे पाळण्यावर ठाम राहणे आवश्यक आहे. एकमेकांचा सन्मान ठेवत दोन्ही देशांनी एकमेकांच्या सार्वभौमत्वाचा आणि हितसंबंधांचा संवेदनापूर्वक आदर करावा,” असे सप्तसुत्री सौहार्द सिद्धांतांचा दाखला देत पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी अपस्थितांना सांगितले.
‘नव्या युगातील भारत व चीन’ या विषयावरील भाषणाला उपस्थितांनी दाद दिली. भाषणाचा समारोप होताच उपस्थितांनी डॉ. मनमोहन सिंग यांना उभे रहून टाळ्यांच्या कडकडाटामध्ये मानवंदना दिली.