भारताने मलेशियाकडून पाम तेलाची आयात कमी केली आहे. भारत जगामध्ये पाम तेलाची सर्वाधिक खरेदी करणारा देश म्हणून ओळखला जातो. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द करण्यावरुन मलेशियाने पाकिस्तानची तळी उचलली होती. मलेशियाच्या या भूमिकेला उत्तर म्हणून भारताने त्यांच्याकडून पाम तेलाची आयात कमी केली आहे. भारताने आक्रमण करुन जम्मू-काश्मीर ताब्यात घेतलं आहे. भारताने पाकिस्तानसोबत चर्चा करुन तोडगा काढावा असे वक्तव्य मलेशियाचे पंतप्रधान माहाथीर मोहम्मद यांनी संयुक्त राष्ट्रामध्ये केले होते.

मलेशियन पंतप्रधानांच्या या विधानावर मोदी सरकार नाराज आहे. नरेंद्र मोदी सरकारकडून निर्बंध येण्याची शक्यता असल्यामुळे पाम तेलाच्या खरेदीदारांनी इंडोनेशियाकडे मोर्चा वळवला आहे. भारत मलेशियाऐवजी इंडोनेशिया आणि युक्रेनकडून खाद्य तेलाची खरेदी वाढवणार आहे. एखाद्या देशाच्या न पटणाऱ्या राजकीय भूमिकेवर भारताने प्रथमच व्यापाराच्या माध्यमातून आपली नाराजी दाखवून दिली आहे.

सध्या जगामध्ये अमेरिका आणि चीनमध्ये सुद्धा व्यापार युद्ध सुरु आहे. भारताचा सुद्धा आता त्या खेळात समावेश झाला आहे जिथे व्यापार फक्त व्यापार नसून शस्त्रासारखा त्याचा वापर होत आहे. पाम तेल हे मलेशियाचे कृषी निर्यातीचे सर्वात मोठे उत्पादन आहे. भारत त्यांचा सर्वात मोठा खरेदीदार देश आहे. भारताने जानेवारी ते सप्टेंबर दरम्यान मलेशियाकडून ३.९ मिलियन टन पाम तेलाची खरेदी केली. हा दोन अब्ज डॉलरचा व्यवहार होता.

काश्मीरमधून कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयावर मलेशियाने टीका केली होती. त्यामुळे भारत सरकार मलेशियाकडून होणाऱ्या वस्तुंच्या आयातीवर निर्बंध घालण्याचा विचार करत आहे. ५ ऑगस्टला भारत सरकारने संसदेच्या दोन्ही सभागृहात विधेयक मंजूर करुन जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केले होते. भारताच्या या निर्णयावर पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचंड गदारोळ केला. पण टर्की, मलेशिया आणि चीन वगळता पाकिस्तानला कुठल्याही देशाचा पाठिंबा मिळाला नाही. संयुक्त अरब अमिराती आणि सौदी अरेबिया प्रमुख इस्लामिक देशांनीही पाकिस्तानची साथ दिली नाही. संयुक्त राष्ट्रासह सर्वांनीच पाकिस्तानला भारतासोबत चर्चा करुन तोडगा काढण्याचे आवाहन केले. पण पाकिस्तानकडून सातत्याने युद्धाची भाषा सुरु होती.