व्यापार विषयावरुन अमेरिकेबरोबर वाद सुरु असला तरी पुढच्या दोन ते तीन वर्षात अमेरिकेबरोबर १० अब्ज डॉलरचे संरक्षण खरेदी करार करण्याची भारताची योजना आहे. भारताने रशियाबरोबर केलेल्या एस-४०० मिसाइल सिस्टिम खरेदीच्या करारावरुनही अमेरिका नाराज आहे. अमेरिकेने निर्बंध लादण्याचेही अप्रत्यक्ष इशारे दिले आहेत.

अमेरिकेबरोबर काही मुद्यांवर मतभेद असले तरी त्यांच्यासोबत मोठे संरक्षण करार करण्याचा भारताचा इरादा आहे.
भारताने अमेरिकेकडून पोसीडॉन – ८ आय ही दीर्घ पल्ल्याची दहा गस्ती विमाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा तीन अब्ज डॉलरचा व्यवहार आहे. मागच्या आठवडयात संरक्षण मंत्रालयाच्या समितीने खरेदीला प्राथमिक मंजुरी दिली आहे. पुढील मंजुरीसाठी आता ही फाईल संरक्षण खरेदी समितीकडे पाठवली जाईल. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह या समितीचे प्रमुख आहेत. भारताने याआधी सुद्धा अमेरिकेकडून पोसीडॉन – ८ आय विमाने विकत घेतली आहेत.

आधीपासून ताफ्यात असलेल्या ८ विमानांपेक्षा नवीन दहा पोसीडॉन – ८ आय अधिक अत्याधुनिक असतील.
बोईंगने पोसीडॉन – ८ आय विमानांची निर्मिती केली असून नौदलाने आपल्या ताफ्यात अशा आठ विमानांचा समावेश केला आहे. सेन्सर्स, हार्पून ब्लॉक २ मिसाइल, एमके-५४ टॉरपीडोसने ही विमाने सुसज्ज आहेत. शत्रुची पाणबुडी शोधून नष्ट करण्याची या विमानांमध्ये क्षमता आहे. जानेवारी २००९ मध्ये अमेरिकेबरोबर हा करार केला होता. २०१६ मध्ये पुन्हा करार करण्यात आला त्यानुसार २०२१-२२ पर्यंत आणखी अशी चार विमाने भारतीय नौदलाला मिळणार आहेत.

त्याशिवाय भारतीय सैन्यदलांसाठी अमेरिकेकडून प्रीडेटर-बी ड्रोन खरेदीची योजना आहे. एमएच-६० रोमिओ, अपाची हेलिकॉप्टर, दिल्लीच्या सुरक्षेसाठी क्षेपणास्त्र यंत्रणा खरेदीची योजना आहे. यात काही करार झाले आहेत. काही बाकी आहेत. २००७ पासून अमेरिकन कंपन्यांनी भारताकडून १७ अब्ज डॉलर्सची संरक्षण साहित्य पुरवठयाची कंत्राटे मिळवली आहेत.