दहशतवाद आणि माओवाद देशाला भेडसावणारी मोठी समस्या आहे. काँग्रेसकडून देशाला मिळालेली ही देणं असून त्यांच्याकडून ती आता आम्हाला मिळाली असल्याची टीका केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केली आहे.

देशातून दहशतवाद आणि माओवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी केंद्र सरकार योग्य पाऊल उचलत असून जे जे आवश्यक आहे, ते सर्व केले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दहशतवाद आणि नक्षलवाद्यांविरोधात सरकार काय पाऊल उचलत आहे, याची माहिती त्यांनी माध्यम प्रतिनिधींना दिली. काँग्रेस सरकारने या प्रश्नाकडे कधी गांभीर्याने पाहिलेच नाही. त्यामुळेच आज ही परिस्थिती निर्माण झाली असल्याचे ते म्हणाले.

तत्पूर्वी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही केंद्र सरकारचा मागील तीन वर्षांतील लेखा-जोखा माध्यमांसमोर मांडला. देशाच्या सुरक्षेत सुधारणा झाल्यामुळेच मुस्लिम लोकसंख्या जास्त असूनही आयसीस या दहशतवादी संघटनेला भारतात आपली पाळेमुळे रूजवता आली नसल्याचा दावा त्यांनी केला. आम्ही आयसिसच्या आव्हानांना यशस्वीपणे तोंड दिले आहे, असेही ते म्हणाले. आम्ही देशाला संरक्षण देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. देशभरात आयसिसशी संबंधीत ९० लोकांना अटक केली. दहशतवादी संघटनांच्या यादीत आयसिस आणि अन्सार उल अम्माह या संघटनांचा समावेश करण्यात आला आहे, असे ते म्हणाले होते. राजनाथ सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार वर्ष २०११ ते २०१४ पर्यंतच्या यूपीए सरकारच्या कार्यकाळाच्या तुलनेत २०१४ ते २०१७ या कालावधीत नक्षली हल्ले २५ टक्क्यांनी कमी झाले आहेत. यूपीए सरकारच्या अखेरच्या तीन वर्षांच्या तुलनेत एनडीए सरकारच्या तीन वर्षांमध्ये नक्षलवादी हल्ल्यात मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण ४२ टक्क्यांनी कमी झाले आहे.