आणखी एक जवान शहीद

भारतात दिवाळी सण साजरा होत असताना पाकिस्तानी सैन्यांकडून कुरापती वाढल्या असून सीमेवर तणावाची स्थिती आहे. पाकिस्तानी सैन्यांनी जम्मू-काश्मीरमधील राजौरी आणि मेंढर सेक्टरमध्ये रविवारी रात्री केलेल्या गोळीबारात भारताचा एक जवान शहीद आणि एक महिलेचा मृत्यू झाला, तसेच पाक सैनिकांनी मेंढरमधील बोलाकोट येथे देखील शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. यात दोन भारतीय सैनिक जखमी झाले आहेत.

पाकिस्तानकडून गेल्या काही दिवसांपासून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. भारतात दिवाळी साजरी होत असताना रविवारी सीमेवर रात्रीपासूनच मोठय़ा प्रमाणात गोळीबार करण्यात आला. आर.एस. पुरा सेक्टरमध्ये तुफान गोळीबार करण्यात आला. रात्री ८ वाजता सुरू झालेला हा गोळीबार मध्यरात्री ३.३० वाजेपर्यंत सुरू होता. पाकिस्तानने तुफान गोळीबार करत भारतीय पोलीस चौक्यांना, नागरिकांना लक्ष्य केले. भारतीय जवानांनीही त्यास चोख प्रत्युत्तर दिले. आर.एस.पुरा सेक्टरमध्ये दोन ठिकाणी स्वयंचलित शस्त्रांनी मॉर्टार डागले. येथूनच जवळच असलेल्या सुचेतगड भागातही गोळीबार करण्यात आला. त्यानंतर सोमवारी दुपारी मेंढरमधील बालाकोट आणि मनकोट भागात शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. पाक सैनिकांनी सुरक्षा चौक्या व नागरी वस्त्यांना लक्ष्य केले. त्यात एक महिलेचा मृत्यू झाला. राजौरी भागातही गोळीबार करण्यात आला. यात एक भारतीय जवान शहीद झाले आहे. हा जवान सीमा सुरक्षा दलाचा आहे.

गेल्या काही दिवसांत वारंवार होत असलेल्या गोळीबारामुळे सीमा भागात राहणाऱ्या नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यांचे दैनंदिन जीवन अस्ताव्यस्त झाले आहे. सीमेवरील गावांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. पाकिस्तानाकडून होत असलेल्या सततच्या आगळीकीमुळे सीमा भागात तणावाची स्थिती असून भारत आणि पाकिस्तानाचे संबंध आणखी ताणले गेले आहेत.

नितीन कोळी यांना मानवंदना

जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे शहीद झालेले जवान नितीन कोळी यांना अखेरचा निरोप देण्यात आला.  सांगली जिल्ह्य़ातील मिरज तालुक्यातील मूळगावी दुधगावात त्यांच्या आर्थिवावर शासकीय इतमातात अंत्यसंस्कार करण्यात आले. नितीन कोळी यांचा भाऊ आणि मोठा मुलगा देवराज कोळीने भडाग्नी दिला.

उरी हल्ल्यानंतर शहीद झालेले जवान

  • ३१ ऑक्टोबर- राजौरी, मेंढर सेक्टमध्ये एक सैनिक आणि एक महिलेचा मृत्यू
  • २८ ऑक्टोबर-मचाली सेक्टरमध्ये मनदीप सिंग रावत शहीद
  • २८ ऑक्टोबर- मचाली सेक्टरमध्ये नितीन कोळी शहीद
  • २८ ऑक्टोबर-नियंत्रण रेषेजवळील तंगधर येथे संदीपसिंग रावत शहीद
  • २७ ऑक्टोबर- आर.एस.पुरा सेक्टरमध्ये जितेंद्र सिंग शहीद
  • २४ ऑक्टोबर-आर.एस. पुरा सेक्टरमध्ये सुशीलकुमार शहीद
  • २२ ऑक्टोबर-कथुवा येथे गुरमनसिंग शहीद
  • १६ ऑक्टोबर-टरकुंडी येथे सुदेश कुमार शहीद