२० जानेवारीला उभय देशांचे परराष्ट्र सचिव भेटण्याची शक्यता; पाकिस्तानही अनुकूल

परराष्ट्र सचिवस्तरीय बोलण्यांचे वेळापत्रक बदलून ती ‘लवकरच’ आयोजित करण्याबाबत भारत व पाकिस्तानचे एकमत झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी, ही बोलणी जानेवारी महिन्यातच होण्याची दाट शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिली. या भेटीचा संबंध पाकिस्तानच्या विशेष तपास पथकाच्या पठाणकोट भेटीशी जोडला जाणार नाही.

ही बोलणी लांबवल्यास त्यांचे उद्दिष्ट साध्य होण्यात अडथळा निर्माण होईल, त्यामुळे ती अनिश्चित काळासाठी लांबवण्यात काही हशील नाही, असे सूत्राने सांगितले. परराष्ट्र सचिव एस. जयशंकर व पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव एजाझ अहमद चौधरी यांचे गुरुवारी दुपारी बोलणे झाले, त्या वेळीच त्यांच्यात हा समझोता झाला होता.

चीन व अमेरिकेच्या सहभागाने अफगाणिस्तानबाबत होत असलेल्या चार पक्षीय समन्वय गटाच्या बैठकीमध्ये चौधरी हे १८ जानेवारीपर्यंत गुंतलेले आहेत. त्यामुळे  २० जानेवारी योग्य राहील, असे इस्लामाबादमधील एका सूत्राने सांगितले.

गुरुवारी दुपारी पॅरिसहून परतलेल्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी पाकिस्तान सरकारने केलेल्या कारवाईबाबत त्यांनी केलेल्या ‘मूल्यांकनाची’ माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली. परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज व एस. जयशंकर यांचाही सहभाग असलेल्या या बैठकीत पुढील पर्यायांचा विचार करण्यात आला. यानंतर लगेचच जयशंकर व चौधरी यांच्यात दूरध्वनीवरून संभाषण झाले.

तथापि, दोन्ही देशांच्या परराष्ट्र सचिवांच्या बैठकीचा संबंध पाकिस्तानच्या विशेष तपास पथकाच्या पठाणकोट भेटीशी जोडला जाणार नसल्याचेही सूत्रांनी सांगितले.

या बैठकीची तारीख जाहीर करण्याचे दोन्ही बाजूंनी ठरवले, तरी ती फार तर एक-दोन दिवस आधी जाहीर केली जाईल. मात्र  संवादाची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यावर उभय बाजूंचे एकमत आहे.