भारतीय उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यांवर करण्यात आलेले हेरगिरीचे आरोप हा भारताची प्रतिमा डागाळण्याचा पाकिस्तानचा डाव असल्याचे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी म्हटले आहे. पाकिस्तानमधील भारतीय उच्चायुक्तालयात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर पाकिस्तानकडून करण्यात आलेले हेरगिरीचे आरोप हे बिनबुडाचे आणि तथ्यहीन असल्याचे स्वराज यांनी म्हटले आहे.

भारत आणि पाकिस्तानकडून आतापर्यंत एकमेकांच्या देशातील आठ अधिकाऱ्यांना मायदेशी बोलावले आहे. यामध्ये वरिष्ठ राजदूतांचादेखील समावेश आहे. नवी दिल्लीतील पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयातील कर्मचारी मेहबूब अख्तर यांची दिल्ली पोलिसांनी हेरगिरीच्या आरोपाखाली चौकशी केली होती. याप्रकरणी लोकसभेत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नाला सुषमा स्वराज यांनी लिखीत स्वरुपात उत्तर दिले. ‘२ नोव्हेंबरला पाकिस्तान सरकारने त्यांच्या उच्चायुक्तालयातील सहा अधिकाऱ्यांना माघारी बोलावले. अख्तरच्या चौकशीदरम्यान ज्या अधिकाऱ्यांची नावे समोर आली, त्या अधिकाऱ्यांना पाकिस्तानने मायदेशी बोलावून घेतले. अख्तर हेरगिरीचे रॅकेट चालवत असल्याचा संशय दिल्ली पोलिसांना होता,’ असे स्वराज यांनी त्यांच्या लिखीत उत्तरात म्हटले आहे.

पाकिस्तानने त्यांचे आणखी दोन अधिकारी आणि त्यांच्या सात कुटुंबीयांना १६ नोव्हेंबरला मायदेशी बोलावले, अशी माहिती स्वराज्य यांच्या लिखीत उत्तरामध्ये आहे. ‘२ नोव्हेंबरला पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी भारतीय उच्चायुक्तालयातील आठ अधिकाऱ्यांची नावे सार्वजनिक केली. भारतीय अधिकारी दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याची माहिती पाकिस्तान सरकारकडून देण्यात आली. तसेच वृत्तांकन पाकिस्तानी माध्यमांकडून करण्यात आले,’ असेही स्वराज यांनी त्यांच्या लिखित पत्रात नमूद केले आहे. ३ नोव्हेंबरला पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याने अधिकृतपणे भारतीय अधिकाऱ्यांची नावे आणि पदे सार्वजनिक केली, असेही स्वराज यांनी त्यांच्या पत्रात म्हटले आहे.

‘पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही. या अधिकाऱ्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबांच्या सुरक्षेच्या दृष्टाने त्यांना माघारी बोलावण्यात आले. भारतीय अधिकारी ८, १० आणि १२ नोव्हेंबरला माघारी परतले,’ अशी माहिती स्वराज यांनी संसदेला लिहिलेल्या पत्रात आहे. ‘पाकिस्तानकडून करण्यात आलेले आरोप भारताची बदनामी करण्यासाठी केले गेले आहेत. भारताची प्रतिमा मलीन करण्याचा हा कुटिल डाव आहे,’ असे स्वराज यांनी त्यांच्या लेखी उत्तरात म्हटले आहे.

मेहबूब अख्तरला दिल्ली पोलिसांनी हेरगिरीच्या आरोपाखाली ताब्यात घेतले होते. अख्तरच्या चौकशीत पोलिसांना महत्त्वपूर्ण माहिती मिळाली होती. मात्र अख्तर पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयातील कर्मचारी असल्याने त्याला संरक्षण होते. त्यामुळे पोलिसांना त्याला अटक करता आली नाही. अख्तरकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी काही जणांना अटक केली होती.