पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे मत
भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांनी सर्व वादग्रस्त विषयांवर तोडगा काढल्यास हे दोन्ही देश चांगल्या शेजाऱ्यांसारखे राहू शकतात, असे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी म्हटले आहे.
मी काश्मीर प्रश्न अतिशय धैर्याने संयुक्त राष्ट्रासमोर मांडला. तसेच, भारताने पाकिस्तानसोबत संबंध सुधारावेत यासाठी आम्ही प्रस्तावही मांडला, असे शरीफ यांनी सांगितले. आम्ही चांगल्या शेजारी देशांप्रमाणे राहून काश्मीर प्रश्नावर तोडगा काढू शकतो, असेही ते म्हणाले. शरीफ यांनी भारतासोबतचे संबंध सुधारण्यास चार मुद्दय़ांवर अहवाल सादर केला आहे. त्यांनी काश्मीरमधून सैन्य मागे घेण्याचा प्रस्ताव मांडताना भारताला सियाचीनमधून सैन्य मागे घेण्याचा सल्ला दिला होता. मात्र, त्याच वेळी पाकिस्तानकडून सीमारेषेवर सातत्याने हल्ले करण्यात येत आहेत. त्यामुळे भारताने पाकिस्तानचा हा प्रस्ताव फेटाळून लावला होता.भारतासोबतचे संबंध सुधारण्यासाठी काश्मीर प्रकरणावर तोडगा निघणे गरजेचे आहे. आम्ही अफगाणिस्तासोबतचे संबंध सुधारत आहोत. तालिबानला रोखण्यासाठी आम्ही एकत्रित प्रयत्न करत असल्याचे शरीफ यांनी सांगितले.
ते म्हणाले की, आमच्या कामगिरीबाबत लोक समाधानी असल्याने आमच्या सरकारला आणखी एकदा राज्य करण्याची संधी मिळेल, असा विश्वास वाटतो. पाकिस्तान सरकारने वाहतूक, आरोग्य, शिक्षण आणि ऊर्जा या क्षेत्रात मोलाची कामगिरी केली आहे. आमचा देश आर्थिकदृष्टय़ा स्थिर असल्याचा दावाही शरीफ यांनी केला.
२०१३च्या निवडणुकीत हेराफेरी केल्याचा आरोप शरीफ यांच्यावर असून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. दोषी आढळल्यास सत्त सोडू असेही शरीफ म्हणाले.