देशात कालपासून करोना लसीकरणास प्रारंभ झाला आहे. मात्र अद्याप करोनाचा संसर्ग थांबलेला नाही. दररोज नवे करोनाबाधित रुग्ण आढळत आहेत व करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येतही भर पडतच आहे. तर, दुसरीकडे करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या देखील वाढताना दिसत आहे. मागील २४ तासांत देशभरात १७ हजार १७० जण करोनामुक्त झाले. तर, १५ हजार १४४ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली व १८१ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला.

देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता १ कोटी ५ लाख ५७ हजार ९८५ झाली आहे. तर, सध्या देशात २ लाख ८ हजार ८२६ अॅक्टिव्ह केसेस असून, आजपर्यंत १ कोटी १ लाख ९६ हजार ८८५ जणांनी करोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आलं आहे. याशिवाय, आतापर्यंत १ लाख ५२ हजार २७४ रुग्णांना करोनामुळे जीव गमावावा लागलेला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने ही माहिती दिली आहे.

गेले दहा महिने सुरू असलेले करोना साथीविरोधातील युद्ध जिंकून या नव्या रोगाला हद्दपार करण्याच्या महालसीकरण मोहीमेस देशभर शनिवारी सुरुवात झाली. लसीकरणाच्या पहिल्या दिवशी देशभरातील एक लाख ९१ हजार करोना योद्ध्यांना लशीची पहिली मात्रा टोचण्यात आली.

लसीकरणाच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी ५.३० पर्यंत ३,३५२ सत्रांमध्ये देशभरातील एक लाख ९१ हजार १८१ करोना योद्ध्यांना लशीची पहिली मात्रा देण्यात आली. लष्करातील ३,१२९ डॉक्टरांसह आरोग्य कर्मचाऱ्यांनाही लस टोचण्यात आल्याचे केंद्रीय आरोग्य विभागाने सांगितले.