देशातील करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा वेग जरी काहीसा मंदावला असला, तरी अद्यापही करोनाचे नवीन रुग्ण मोठ्या संख्येने वाढतच आहेत. शिवाय, करोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतही भर पडतच आहे. मागील २४ तासांमध्ये देशभरात ७३ हजार २७२ नवे करोनाबाधित आढळले, तर ९२६ जणांना करोनामुळे जीव गमावावा लागला आहे. देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता ६९ लाख ७९ हजार ४२४ वर पोहचली आहे.

देशभरातील एकूण ६९ लाख ७९ हजार ४२४ करोनाबाधितांच्या संख्येत ८ लाख ८३ हजार १८५ अॅक्टिव्ह केसेस, बरे झालेले व डिस्चार्ज मिळालेले ५९ लाख ८८ हजार ८२३ जण व आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या १ लाख ७ हजार ४१६ जणांचा समावेश आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.

देशभरात ९ ऑक्टोबरपर्यंत ८,५७,९८,६९८ नमूने तपासले गेले. यातील ११ लाख ६४ हजार १८ नमूने काल तपासण्यात आले असल्याची माहिती आयसीएमआरकडून मिळाली आहे.

सध्या करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. करोनाचा आलेखही वर खाली होत असल्याचं दिसून येत आहे. कधी अचानक करोनाबाधितांची संख्या अधिक असते तर कधी त्यांच्या तुलनेत कमी प्रमाणात करोनाबाधित आढळून येतात. अशा परिस्थितीत करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक देशांमध्ये लस विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहे. अशातच अनेकांना ही लस नक्की येणार तरी कधी हा प्रश्न नक्कीच पडलाय. करोनावरील लस नक्की केव्हा उपलब्ध होईल याचं उत्तर या महिन्याच्या अखेरीस मिळण्याची शक्यता आहे. या महिन्याच्या अखेरिस करोनावरील दोन लसींच्या दुसऱ्या टप्प्यातील अहवाल सादर होण्याचीही शक्यता आहे.