अमेरिकेच्या दबावामुळे भारताचा निर्णय

नवी दिल्ली : अमेरिकेच्या दबावाखाली येऊन भारताने इराणकडून तेलाची आयात पूर्णपणे थांबवली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तथापि, ज्या आयातींबाबत इराणशी आधीच करार झाले आहेत, त्यानुसार प्रलंबित असलेल्या खेपांतील तेल मिळवण्यासाठी भारत अमेरिकेशी वाटाघाटी करत करत आहे.

भारताचा निर्णय इराणमधून कच्चे तेल आणि पेट्रोलियम उत्पादनांची सर्व आयात थांबवण्याच्या ट्रम्प प्रशासनाच्या निर्देशांना अनुसरून आहे. इराणशी केलेल्या अणुकरारातून बाहेर पडल्यानंतर अमेरिकेने इराणच्या हसन रूहानी राजवटीवर विशेषत: इराणी अर्थव्यवस्थेचा प्रमुख आधार असलेल्या कच्च्या तेलाबाबत आणि इतरही अनेक निर्बंध लादले होते. यानंतर, आपल्या ऊर्जाविषयक गरजांसाठी इराणवर अवलंबून असलेल्या सात देशांना अमेरिकेने गेल्या नोव्हेंबरमध्ये सहा महिन्यांची सवलत दिली होती.

‘सिग्निफिकंट रिडक्शन एक्झेम्प्शन’ या नावानेही ओळखल्या जाणाऱ्या या सवलतीची मुदत २ मे रोजी संपली. ज्यांच्याबाबत आधीच करार झाले होते, त्यातील काही तेल अद्याप यायचे आहे. त्यामुळे त्या खेपा येऊ देण्याबाबत आम्ही अमेरिकेशी वाटाघाटी करत आहोत, असे एका अधिकाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले. अमेरिका सरकारशी या संदर्भात चर्चा सुरू असली, तरी अद्याप काही सकारात्मक घडलेले नसल्याचेही तो म्हणाला.