भारतीय अर्थव्यवस्थेला जर आम्ही पाच लाख कोटी डॉलरपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्टय ठेवले आहे तर त्या दिशेने आम्ही तशी पावले सुद्धा उचलत आहोत. विकासाला चालना, गुंतवणूकीला प्रोत्साहन आणि गुंतवणूक वाढवण्याच्या दृष्टीने आम्ही निर्णय घेत आहोत असे अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी बुधवारी सांगितले.

श्रीमंतांवर इन्कम टॅक्सवर सरचार्ज लावण्याच्या निर्णयाचे त्यांनी समर्थन केले. देश उभारणीत हे छोटे योगदान आहे असे त्या म्हणाल्या. अर्थसंकल्प सादर करताना आर्थिक विकासावर जास्त लक्ष दिले आहे असे निर्मला सीतारमन यांनी लोकसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना सांगितले.

इन्फ्रास्ट्रक्चरच्या विकासावर सरकारचा भर असून पुढच्या पाच वर्षात १०० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र सरकारने २२ वस्तुंवरील एमएसपी वाढवल्याची माहिती त्यांनी दिली. २०२४-२५ पर्यंत अर्थव्यवस्थेला पाच लाख कोटी डॉलरपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्टय गाठण्यासाठी सरकार वेगवेगळी पावले उचलत आहे असे सीतारमन म्हणाल्या.