भारताविरोधातील दहशतवादी हल्ले थांबवले, तरच दोन्ही देशांत चर्चा होऊ शकेल, असा स्पष्ट इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे समपदस्थ नवाझ शरीफ यांच्याबरोबर झालेल्या बैठकीच्या वेळी दिल्याचे परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांनी बुधवारी सांगितले.
श्रीमती स्वराज यांनी सांगितले, की दोन्ही देशांतील संबंध प्रभावी व यशस्वी तेव्हाच होतील, जेव्हा भारतातील दहशतवादी हल्ले थांबवले जातील, बॉम्बस्फोटांच्या आवाजात चर्चेचा आवाज कुठल्या कुठे विरून जातो असे मोदी यांनी शरीफ यांना सांगितले.
 दोन्ही देशांत यापुढे सचिव पातळीवर चर्चा होणार असून पाकिस्तानशी चांगले संबंध असावेत अशीच भारताची इच्छा आहे. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रकरणाची सुनावणी वेगाने करण्यात यावी असेही मोदी यांनी या वेळी सांगितल्याचे त्या म्हणाल्या. परराष्ट्र मंत्रिपदाचा कार्यभार घेतल्यानंतर त्यांनी सांगितले, की जगाला भारताचे सामथ्र्य दाखवून देणे हा आमचा प्रमुख उद्देश असून शेजारी देश, आफ्रिकी देश, आशियान सदस्य राष्ट्रे तसेच युरोप व इतर देशांशी सहकार्याचे संबंध प्रस्थापित करण्याचा आमचा प्रयत्न राहील.