पूर्व लडाखमध्ये तणावाची स्थिती कायम आहे. शब्द दिल्याप्रमाणे चीनने अजूनही पूर्णपणे माघार घेतलेली नाही. भारतीय यंत्रणांचे चीनच्या सात लष्करी तळांवर अत्यंत बारीक लक्ष आहे. मागच्या काही आठवडयात तिथे लष्करी हालचाली वाढल्या आहेत.

वरिष्ठ सूत्रांच्या माहितीनुसार, चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या एअर फोर्सने अलीकडेच या तळांवर मोठया प्रमाणात सुधारणा केल्या आहेत. शेल्टर्स उभारले आहेत. धावपट्टीचा विस्तार केला असून अतिरिक्त मनुष्यबळ तैनात केले आहे.
लडाखपासून जवळ असणारे होतान, गारगुनसा आणि काशगर त्यानंतर हॉपिंग, कोनका झाँग, लिनझी आणि पॅनगात या चीनच्या लष्करी तळांवर भारताचे अत्यंत बारीक लक्ष आहे अशी माहिती सूत्रांनी दिली.

“शिनजियांग आणि तिबेट प्रांतामध्ये असलेल्या चीनच्या या सात लष्करी तळांवर उपग्रह आणि टेहळणी उपकरणांच्या माध्यमातून लक्ष ठेवले जात आहे”, असे सरकारी सूत्रांनी इंडिया टुडेला सांगितले.

या सात एअरबेसवर चीनने सहा वेगवेगळया प्रकारची फायटर विमानं आणि बॉम्बर विमानं तैनात करुन ठेवली आहेत. चीनची आक्रमकता लक्षात घेऊन इंडियन एअर फोर्सने सुद्धा चीन, पाकिस्तान दोन्ही सीमांवर आपली घातक फायटर विमानं सज्ज ठेवली आहेत.