नवी दिल्ली : करोनाविरोधातील लढय़ात अग्रभागी राहून जीव धोक्यात घालत रुग्णांना बरे करणारे लाखो डॉक्टर, निमवैद्यकीय कर्मचारी यांच्या कामाचे देशवासीयांच्या वतीने भारतीय हवाई दलाने रुग्णालयांवर पुष्पवृष्टी करून कौतुक केले. भारतीय हवाई दलाच्या सुखोई ३० एमकेआय, मिग २९, जग्वार विमानांनी आकाशात उत्तुंग भरारी घेत दिल्ली शहरावर घिरटय़ा घालत सकाळी ११ वाजता किमान अर्धा तास करोनाचा सामना करण्यात मोठी भूमिका पाडणारे डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी यांच्या कामाची प्रतिकात्मक प्रशंसा केली.  सी १३० विमानांनीही दिल्ली व राजधानी क्षेत्रात ५०० ते १००० मीटर उंचीपर्यंत भरारी घेतली.

करोना विरोधात लढणारे डॉक्टर्स व आरोग्य कर्मचारी यांच्याबाबत कृतज्ञतेचा हा सोहळा दिल्लीतील राष्ट्रीय पोलीस स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून सुरू झाला. करोनाविरोधातील लढाईत पोलिसांनीही कौतुकास्पद काम केले आहे त्यांचा सन्मान करण्यात आला. लष्कराच्या एका हेलिकॉप्टरने राष्ट्रीय पोलीस स्मारकावर फुलांच्या पाकळ्या सोडल्या. दिल्ली शिवाय मुंबई, जयपूर, अहमदाबाद, गुवाहाटी, पाटणा, लखनऊ, श्रीनगर, चंडीगड, जयपूर, भोपाळ, हैदराबाद, बेंगळुरू, कोईमतूर व तिरुअनंतपूरम येथेही अशाच प्रकारे पोलीस, डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी यांच्या कामाला मानवंदना देण्यात आली. भारतीय हवाई दल, नौदल, यांच्या हेलिकॉप्टर्सनी दिल्ली, मुंबई, शिलाँग, गुवाहाटी व इतर ठिकाणच्या प्रमुख रुग्णालयांवर पुष्पवृष्टी केली. सायंकाळी पश्चिम विभागाच्या नौदल जहाजांवर विद्युत रोषणाई करून करोना विरोधातील योद्धय़ांच्या कामाला उजाळा देण्यात आला. संरक्षण विभाग प्रमुख बिपीन रावत यांनी शुक्रवारी असे सांगितले होते की, ३ मे रोजी लष्कर करोना योद्धय़ांचा विविध उपक्रमांनी सन्मान करील. संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी करोना योद्धय़ांच्या या  सन्मानासाठी लष्कराचे आभार मानले.

सुखोई विमाने सहभागी

जयपूर : भारतीय हवाई दलाने राजस्थानात जयपूर येथ ेकाही रुग्णालयांवर पुष्पवृष्टी केली. त्यात तीन सुखोई विमाने सहभागी झाली होती. दोन एमआय १७ हेलिकॉप्टर्सनी सवाई मानसिंग रुग्णालय, राजस्थान युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस या  संस्थांवर पुष्पवृष्टी केली.