कतारमध्ये २०२२ साली होणाऱ्या फिफा विश्वचषक स्पर्धेच्या सुरक्षाव्यवस्थेसाठी भारतातील पोलीस अधिकाऱ्यांची मदत घेतली जाणार आहे. या अधिकाऱ्यांनी कतारमधील सुरक्षा परिषदेत सहभागी व्हावे, अशी विनंती कतारकडून भारताला करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर मुंबईतील २६\११ दहशतवादी कारवाईच्यावेळी मोहिमेत सहभागी असलेल्या, आयपीएल स्पर्धेची सुरक्षा व्यवस्था हाताळण्याचा अनुभव असलेल्या २० आयपीएस अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. हे अधिकारी मार्च महिन्यात दोहा येथे येणाऱ्या सुरक्षा परिषदेत सहभागी होती.

दोहा आणि फिफाकडून विनंती करण्यात आल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाकडून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून पोलीस अधिकाऱ्यांची नावे सुचवण्याचे आदेश दिले होते. त्यामधून २० आयपीएस अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. दोहा सुरक्षा परिषदेत सहभागी होणे हे आपल्या पोलीस अधिकाऱ्यांसाठी भविष्याच्यादृष्टीने फायदेशीर ठरेल, असे मत एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केले. या २० आयपीएस अधिकाऱ्यांच्या पथकात इंडियन सुपर लीग (फुटबॉल) , U-17 फुटबॉल विश्वचषक स्पर्धा आणि उत्तराखंडमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. यामध्ये महाराष्ट्र आणि एनएसजीला २६\११ च्या मोहीमेत सहभागी असणाऱ्या पोलीस अधिक्षक व उपमहानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची नावे सुचवण्यास गृहमंत्रालयाने सांगितले होते. याशिवाय, इंटेलिजन्स ब्युरोमधील अधिकाऱ्यांचाही दोहाला जाणाऱ्या या पथकात समावेश असेल. या सुरक्षा परिषदेत होणाऱ्या अधिकाऱ्यांची कारकीर्द निष्कलंक असावी आणि त्यांनी इंग्रजीचे उत्तम ज्ञान असावे, या दोन अटी ठेवण्यात आल्या होत्या. हे निकष डोळ्यासमोर ठेवून पोलीस अधिकाऱ्यांची निवड करण्यात आल्याचे गृहमंत्रालयाने सांगितले.