इंटरनेटचा सातत्याने वापर करण्यामध्ये भारतीय जगात भारी असल्याचे एका सर्वेक्षणावरून स्पष्ट झाले आहे. सर्वेक्षणानुसार, ५३ टक्के भारतीय सातत्याने विविध उपकरणांच्या माध्यमातून इंटरनेटचा वापर करीत असतात, असे दिसून आले आहे. सातत्याने इंटरनेट वापरणाऱयांची जागतिक सरासरी ५१ टक्के आहे. त्यामुळेच जगातील इतर लोकांपेक्षा भारतीय नागरिक जास्त प्रमाणात इंटरनेटच्या संपर्कात असतात, असे या सर्वेक्षणातून दिसते.
लंडनमधील ‘एटी केर्ने ग्लोबल रिसर्च’ या व्यवस्थापन क्षेत्रातील कंपनीने नुकतेच हे सर्वेक्षण केले. ‘कनेक्टेड कन्झुमर्स आर नॉट क्रिएटेड इक्वल : ए ग्लोबल पर्सपेक्टिव्ह’ असे या सर्वेक्षण प्रबंधाचे नाव आहे. जागतिक सरासरीचा विचार करता ५१ टक्के लोक सातत्याने इंटरनेटचा वापर करीत असतात. चीनमध्ये हे प्रमाण अवघे ३६ टक्के आहे तर जपानमध्ये ३९ टक्के इतके आहे. त्यातुलनेत भारतामध्ये ५३ टक्के लोक इंटरनेटचा वापर करतात, असे दिसून आले. यावर्षी जुलैमध्ये करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात दहा देशांमधील दहा हजार लोक सहभागी झाले होते.
सातत्याने इंटरनेटचा वापर करण्यात भारतीय पुढे असल्यामुळे ऑनलाईन खरेदी-विक्री आणि सोशल नेटवर्किंग साईट्स या दोन्हींचा त्यांच्यावर प्रभाव आहे. या दोन्हींचा भारतीयांकडून होणारा वापर वाढलेला आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी ९७ टक्के लोकांनी त्यांचे फेसबुक अकाऊंट असल्याचे सांगितले तर ७७ टक्के लोक दिवसातून एकदा सोशल नेटवर्किंग साईट्सवर लॉग इन करतात, असे आढळले.