परदेशात राहणारे भारतीय ७० अब्ज डॉलर्स मायदेशी पाठवतात हे प्रमाण इतर देशांचे स्थलांतरित कर्मचारी मायदेशी पाठवत असलेल्या पैशांच्या तुलनेत खूपच जास्त आहे, असे जागतिक बँकेने म्हटले आहे. २०१४ च्या आकडेवारीनुसार भारताचे कर्मचारी यात आघाडी टिकवून आहेत.
भारतीय कर्मचारी एवढय़ा मोठय़ा प्रमाणात पैसे पाठवू शकण्याचे कारण म्हणजे युरोपची आर्थिक व्यवस्था कमकुवत झालेली आहे, रशियाची अर्थव्यवस्था घसरलेली आहे व युरो-रूबल या दोन्ही चलनांचे अवमूल्यन झाले आहे.
विकसित देशांकडून विकसनशील देशात त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून पाठवला जाणारा निधी २०१५ पर्यंत ४४० अब्ज डॉलर इतका होईल. ही वाढ गेल्या वर्षीच्या तुलनेत ०.९ टक्के असणार आहे.
उच्च उत्पन्न असलेल्या देशात हे प्रमाण ०.४ टक्के वाढून ५८६ अब्ज डॉलर्स होणार आहे. अमेरिका, सौदी अरेबिया, जर्मनी, रशिया व संयुक्त अरब अमिरात या पाच देशातून भारतीय, चिनी, फिलिपिनी, मेक्सिकन, नायजेरियन कर्मचाऱ्यांना जास्त पैसा मिळत आहे. २०१४ मध्ये या देशांना स्थलांतरित कर्मचाऱ्यांकडून ५८३ अब्ज डॉलर्स मिळाले. भारताला ७० अब्ज, चीनला ६४ अब्ज, फिलिपिन्सला २८ अब्ज डॉलर्स मिळाले आहेत, त्यामुळे या देशांमधील पायाभूत सुविधांना पाठबळ मिळेल, असे जागतिक बँकेचे मुख्य अर्थतज्ज्ञ व वरिष्ठ उपाध्यक्ष कौशिक बसू यांनी म्हटले आहे.

देश           पाठवलेल्या रकमा
*भारत         ७० अब्ज डॉलर्स
*चीन          ६४ अब्ज डॉलर्स
*फिलिपिन्स    २८ अब्ज डॉलर्स